Signs of revolt in BJP, Shiv Sena, NCP | भाजप, शिवसेना, राकाँत बंडखोरी होण्याची चिन्हे
भाजप, शिवसेना, राकाँत बंडखोरी होण्याची चिन्हे

ठळक मुद्देपुसदमध्ये चाचपणी : राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गट बाहेर पडण्याच्या तयारीत

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : युती व आघाडीतील जागा वाटप समाधानकारक नसल्याचे सांगत जिल्ह्यात भाजप, शिवसेना व राष्टÑवादी काँग्रेसमध्ये अनेक इच्छुकांनी बंडाचे निशाण फडकविण्याची तयारी चालविली आहे.
जिल्ह्यात विधानसभेच्या सात पैकी सहा मतदारसंघावर भाजपने दावा सांगितला आहे. त्यापैकी चार मतदारसंघात उमेदवारही जारी केले आहेत. पुसद व उमरखेडच्या जागेचा निर्णय अद्याप झालेला नाही. भाजपाऐवढीच ताकद जिल्ह्यात असताना शिवसेनेला केवळ एकच मतदारसंघ का? म्हणून शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी पहायला मिळते. शिवसेनेने सात पैकी दिग्रस, पुसद वगळता वणी व उमरखेड मतदारसंघावर दावा सांगितला होता. पुसद भाजपला देऊन उमरखेड सेनेकडे घेण्याची तयारी दर्शविली होती. परंतु भाजपने केवळ एकाच अन् त्याही परंपरागत मतदारसंघावर बोळवण केल्याने शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे. त्यातूनच वणीमध्ये माजी आमदार विश्वास नांदेकर, उपजिल्हा प्रमुख सुनील कातकडे, आशिष खुलसंगे, उमरखेडमध्ये डॉ. विश्वनाथ विणकरे, यवतमाळात संतोष ढवळे, नगरसेवक गजानन इंगोले यांनी बंडखोरीची तयारी चालविली आहे. वणी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडावा म्हणून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आपले मित्र डॉ. महेंद्र लोढा यांच्याकरिता पक्षाकडे प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. हा मतदारसंघ काँग्रेसकडेच कायम राहिला. त्यामुळे राष्ट्रवादीचे इच्छुक डॉ. लोढा यांनी आता बंडखोरी करीत वंचित बहुजन आघाडीचा झेंडा हाती घेतला आहे.
भाजपने आर्णीचे वादग्रस्त आमदार प्रा. राजू तोडसाम यांचे तिकीट कापले आहे. त्यामुळे तोडसाम अपक्ष रिंगणात उतरणार असल्याचे सांगितले जाते.
पुसद मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोहरराव नाईक यांच्या कुटुंबातून अलिकडेच बंडाचे निशाण फडकविले गेले होते. परंतु समर्थकांचा विरोध व पक्षातून मनधरणी झाल्याने तूर्त ही बंडखोरी थांबली. मात्र अद्यापही त्या दृष्टीने चाचपणी सुरू असल्याचे बोलले जाते. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. त्यात माजी जिल्हाध्यक्ष, माजी सभापती, महिला पदाधिकारी अशा काहींचा समावेश आहे. हा गट यवतमाळ व पुसदमध्ये भाजपला ताकद देण्यासाठी खास प्रयत्न करणार आहे.
भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन मतदारसंघातील उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाही. ते जाहीर झाल्यानंतर या दोन्ही पक्षात व मतदारसंघात आणखी कुणाची बंडखोरी होते का हे पाहणे महत्वाचे ठरते. बंडखोरीसाठी कायम सर्वत्र चर्चेत राहणाऱ्या काँग्रेस पक्षात मात्र सध्या तरी कोणत्याच मतदारसंघात बंडखोरीची चिन्हे दिसत नाहीत, हे विशेष.


Web Title: Signs of revolt in BJP, Shiv Sena, NCP
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.