नेरची सून झाली महाराष्ट्राची स्वच्छतादूत

By Admin | Updated: October 4, 2015 00:23 IST2015-10-04T00:23:23+5:302015-10-04T00:23:23+5:30

स्वच्छता हा स्वभावाचा भाग आहे. स्वच्छतेची सवय स्वीकारली, तर सामान्य माणूसही असामान्य बनतो.

Nirch was born as the cleaner of Maharashtra | नेरची सून झाली महाराष्ट्राची स्वच्छतादूत

नेरची सून झाली महाराष्ट्राची स्वच्छतादूत

आंदणात घेतले शौचालय : पंतप्रधानांच्या हस्ते होणार चैतालीचा सन्मान
किशोर वंजारी नेर
स्वच्छता हा स्वभावाचा भाग आहे. स्वच्छतेची सवय स्वीकारली, तर सामान्य माणूसही असामान्य बनतो. याचे उदाहरण दूर नव्हे आपल्या शेजारीच आहे. नेरची सून चैताली. लग्नात तिने आपल्या वडिलांना सर्व वस्तू टाळून शौचालयच मागितले. तिच्या स्वच्छतेच्या ध्यासाची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली अन् आज ती महाराष्ट्राची स्वच्छतादूत बनली!
अकोला जिल्ह्यातील कारंजा रमजानपूर (ता. बाळपूर) हे छोटेसे गाव चैतालीचे माहेर. वडील दिलीप वासूदेव राठोड हे आसपासच्या गावात मसाला सुपारी विकून संसार चालवितात. एक मुलगी अन् एक मुलगा हा त्यांचा परिवार. घरात गरिबी असली तरी मुलांना त्यांनी स्वच्छतेची शिस्त लावली. चैताली बारावीपर्यंत शिकली. पुढेही शिकण्याची ईच्छा होतीच. पण परिस्थितीने अडविले.
नेर तालुक्यातील मोझर येथील देवेंद्र उत्तमराव माकोडे हे स्थळ चैतालीकडे विवाहासाठी आले होते. देवेंद्रची परिस्थितीही हलाखीचीच. तो लहान असतानाच वडील वारले. गावातच फोटोग्राफीचा व्यवसाय करून तो आईसह कसाबसा उपजीविका करायचा. घरी शौचालय बांधण्याची ईच्छा असूनही बांधू शकला नाही.
देवेंद्र आणि चैतालीचा विवाह जुळल्यावर त्यांनी फोनवर एकमेकांचे सुख-दु:ख जाणून घेतले. त्यातूनच आपल्या सासरी शौचालय नसल्याचे चैतालीला कळले. देवेंद्रनेही लग्नानंतर दोन-तीन महिन्यात शौचालय बांधण्याची ग्वाही दिली. पण चैतालीला ते पटले नाही. तिने आपल्या वडिलांना लग्नाच्या आंदणात शौचालयच देण्याची विनंती केली. १५ मे २०१५ रोजी विवाह होता. वडिलांनी चैतालीसाठी रेडीमेड शौचालय आणून दिले. या आगळ्या आंदणाची दखल प्रसिद्धी माध्यमांनीही घेतली अन् चैतालीची कीर्ती दिल्लीच्या सुलभ इंटरनॅशनल संस्थेपर्यंत पोहोचली. या संस्थेचे संस्थापक डॉ. बिंदेश्वर पाठक यांनी चैतालीला १० लाखांचा पुरस्कार घोषित केला. चैतालीला दिल्ली येथे बोलावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे.
शुक्रवारीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चैतालीला सन्मानित करण्यात आले. शासनाने महाराष्ट्राची स्वच्छता दूत म्हणून आता चैतालीची निवड केली आहे. अकोल्याचे पालकमंत्री रणजित पाटील यांनीही तिला सन्मानित केले.

Web Title: Nirch was born as the cleaner of Maharashtra