Controversial policeman Ashish Chaubey's dismissal continued | वादग्रस्त पोलीस शिपाई आशिष चौबेची बडतर्फी कायम
वादग्रस्त पोलीस शिपाई आशिष चौबेची बडतर्फी कायम

ठळक मुद्देमहानिरीक्षकांनी अपिल फेटाळले : एसपींचा प्रस्ताव ठरविला योग्य

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लाखो रुपयांच्या वाटमारी सारख्या गुन्ह्यांचा कट रचल्याचा ठपका असलेल्या पोलीस शिपाई आशिष चौबे याची बडतर्फी पोलीस महानिरीक्षकांच्या दरबारातही कायम राहिली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी पोलीस शिपाई चौबे याच्या बडतर्फीचा प्रस्ताव पाठविला होता. त्या विरोधात चौबे याने अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांच्याकडे अपिल केले होते. परंतु अलिकडेच झालेल्या सुनावणीत रानडे यांनी एसपींनी पाठविलेला बडतर्फीचा प्रस्ताव योग्य ठरवित चौबे याचे अपिल फेटाळून लावल्याची माहिती महानिरीक्षक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.
जिल्हा पोलीस दलात कार्यरत पोलीस शिपाई आशिष चौबे याचे ‘कारनामे’ पोलीस दलात चर्चेचा विषय होते. मात्र कोणतीच बाब रेकॉर्डवर येणार नाही याची खबरदारी तो घेत असल्याने त्याच्याविरुद्ध कारवाई करणे कठीण झाले होते. परंतु गोदनी रोडवर भरदिवसा हवालामधील ९९ लाखांच्या वाटमारीचे धागेदोरे चौबेपर्यंत पोहोचले. वास्तविक पोलीस रेकॉर्डवर या वाटमारीची रक्कम अगदीच नाममात्र दाखविली गेली आहे. प्रत्यक्षात त्याचा आकडा किती तरी मोठा आहे. पोलीस तपासात चौबेचा पर्दाफाश झाला. त्याच्यावर गुन्हाही नोंदविला गेला. एवढ्या मोठ्या गंभीर गुन्ह्याचा तोच सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. यासोबतच त्याने गतकाळात केलेल्या विविध कारनाम्यांची खातरजमाही पोलीस प्रशासनाने केली. पोलीस खात्याच्या प्रतिमेला डाग लावणाऱ्या पोलीस शिपाई आशिष चौबेला सुरुवातीला निलंबित केले होते. परंतु निलंबन काळातही त्याचे कारनामे सुरूच राहिल्याने अखेर त्याला बडतर्फ केले.

पोलीस खात्यात परतण्याची वाट आता खडतर
चौबे सारखे खार्की वर्दीतील दरोडेखोर पोलीस खात्यात नकोच असा बहुतांश कर्मचाऱ्यांचा सूर असून त्यावर एसपींपाठोपाठ आता महानिरीक्षकांनीही शिक्कामोर्तब केले. त्यामुळे आशिष चौबेची पोलीस खात्यात परतण्याची वाट आणखी खडतर झाली आहे.


Web Title: Controversial policeman Ashish Chaubey's dismissal continued
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.