‘शंभू’ अन् ‘मना’च्या मिलनातून अवतरला ‘शिवा’; करुणाश्रमात प्रथमच जन्मले काळवीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 06:58 PM2020-02-26T18:58:06+5:302020-02-26T18:59:33+5:30

मागील काही वर्षांपूर्वी समुद्रपूर येथे एका व्यक्तीने मादी प्रजातीचे काळवीट असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली.

'Shiva' descended from the union of 'Shambhu' and 'Mana | ‘शंभू’ अन् ‘मना’च्या मिलनातून अवतरला ‘शिवा’; करुणाश्रमात प्रथमच जन्मले काळवीट

‘शंभू’ अन् ‘मना’च्या मिलनातून अवतरला ‘शिवा’; करुणाश्रमात प्रथमच जन्मले काळवीट

Next

- महेश सायखेडे

वर्धा : अलूप्तप्राय प्रजातीच्या काळवीट या वन्य प्राण्याचे नैसर्गिक अधिवासात प्रजनन होणे ही सर्वसाधारण बाब. मात्र, समुद्रपूर येथून आणण्यात काळवीट मादी ‘मना’ आणि यवतमाळ जिल्ह्यातून आणण्यात आलेला काळवीट नर ‘शंभू’ यांचे मिलन पिपल फॉर अ‍ॅनिमल्सच्या पिपरी (मेघे) येथील करुणाश्रमात झाले. इतकेच नव्हे तर ‘मना’ हिने गोंडस अशा एका नर प्रजातीच्या काळविटाला जन्म दिला आहे. या नव्या पाहूण्याचे करुणाश्रमात ‘शिवा’ असे नामकरण करण्यात आले आहे. करुणाश्रमात पहिल्यांदाच काळवीटाचे ब्रिडींग झाल्याने आणि नव्या पाहूण्याच्या आगमनामुळे करुणाश्रमातील वन्यप्राणी मित्रांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मागील काही वर्षांपूर्वी समुद्रपूर येथे एका व्यक्तीने मादी प्रजातीचे काळवीट असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर या काळवीट मादीला पिपल्स फॉर अ‍ॅनिमल्सच्या पिपरी (मेघे) येथील करुणाश्रमात आणण्यात आले. सदर काळवीट लहानपणापासून माणसांच्या सहवासात राहिल्याने आणि तिच्या सवईत बदल झाल्याने तिला तडकाफडकी जंगलात सोडणे योग्य नसल्याचे लक्षात आल्याने ती मागील काही महिन्यांपासून करुणाश्रमात होती.

मना ही करुणाश्रमात असतानाच यवतमाळ जिल्ह्यातून वनविभागाच्या अधिकाºयांनी ताब्यात घेतलेला काळवीट नर करुणाश्रमात आणला. हे दोन्ही वन्यप्राणी एकाच प्रजातीचे असल्याने ‘मना’ आणि ‘शंभू’ याला एकाच ठिकाणी ठेवण्यात आले. अशातच या दोघांचा मेल झाला. काही दिवसांनी मना गर्भवती असल्याचे करुणाश्रमातील वन्यजीव प्रेमींच्या निदर्शनास आले. त्यानंतर २१ फेबु्रवारीला ‘मना’ने गोंडस अशा नर प्रजातीच्या काळवीटास जन्म दिला. काळवीट हा प्राणी वन्यजीव अधिनियम १९७२ अंतर्गत अनुसूची एक मध्ये समाविष्ट आहे.
 

महाशिवरात्रीच्या दिवशी जन्मल्यामुळे नाव ठेवले ‘शिवा’

मादी काळवीटाला मना हे नाव केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण, वन मंत्रालय भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त असलेल्या पिपल फॉर अ‍ॅनिमल्स वर्धा द्वारा संचालित  करुणाश्रमात देण्यात आले. तर यवतमाळ येथून आलेल्या नर काळवीटाला यवतमाळकरांनीच शंभू हे नाव दिले होते. मना आणि शंभूच्या मिलनानंतर जन्मलेला गोंडस नर काळवीट हा महाशिवरात्रीला जन्मला. त्यामुळे त्याचे नाव ‘शिवा’ ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

नर-मादी काळवीट या वन्यप्राण्याचा मेल होत पहिल्यांदाच ब्रिडींग करुणाश्रमात झाले आहे. मना आणि शंभूच्या मिलनातून जन्मलेला काळवीट नर हा महाशिवरात्रीच्या दिवशी जन्मला. त्यामुळे त्याला आम्ही लाडाने ‘शिवा’ असे नाव दिले आहे.
- आशीष गोस्वामी, संस्थापक अध्यक्ष, पिपल्स फॉर अ‍ॅनिमल्स, वर्धा.
 

काही दिवसांपूर्वी जन्मलेल्या ‘शिवा’ या काळवीटाचे संगोपन योग्य पद्धतीने केले जात आहे. इतकेच नव्हे तर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप जोगे हे नवजात काळवीटावर लक्ष ठेऊन आहेत.
- कौस्तूभ गावंडे, वन्यप्राणी मित्र वर्धा.

Web Title: 'Shiva' descended from the union of 'Shambhu' and 'Mana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.