नोकरीधंद्यासाठी हीच ती वेळ; भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी सरसावले हात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 01:19 AM2020-05-29T01:19:24+5:302020-05-29T01:19:29+5:30

मनसे देणार कौशल्यविकासाचे धडे

 This is the time for employment; Hands clasped for Bhumiputra's employment | नोकरीधंद्यासाठी हीच ती वेळ; भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी सरसावले हात

नोकरीधंद्यासाठी हीच ती वेळ; भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी सरसावले हात

Next

- प्रज्ञा म्हात्रे 

ठाणे : शहरात रोजगारासाठी आलेले परप्रांतीय लॉकडाउनमुळे मूळ गावी परतल्यामुळे भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. छोटे व्यवसाय, कौशल्यपूर्ण कामांमध्ये भूमिपुत्रांनी यावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परप्रांतीय गेल्यामुळे निर्माण झालेली पोकळी भूमिपुत्रांनी भरून काढून या संधीचे सोने करावे, अशी अपेक्षा सर्वच थरांतून केली जात आहे. मनसेने त्यासाठी मराठी तरुणांमध्ये कौशल्यविकासाबाबत योजनाही आखली आहे.

ठाणे जिल्ह्यात स्थलांतरित मजुरांची संख्या अधिक आहे. लॉकडाउनमुळे उपासमार, पगार नसल्याने घराचे भाडे भरण्यास पैसे नसल्याने ते मूळ गावी परतत आहेत. परप्रांतीयांच्या जाण्यामुळे हार-फुलांचा व्यवसाय, खाद्यपदार्थांच्या गाड्या, लॉण्ड्री, इलेक्ट्रॉनिक कामे, भाजी, मासळी, फळव्यवसाय, वेल्डर, सुरक्षारक्षक, सुतारकाम, बांधकाम, रिक्षा-टॅक्सी व्यवसाय अशा अनेक छोट्या-मोठ्या रोजगारांची संधी मिळणार आहे. मनसेने यासाठी पुढाकार घेऊन मराठी तरुणांचे समुपदेशन आणि मार्गदर्शन करण्याचे ठरवले आहे. ठाण्यातील अमराठी व्यापारीही भूमिपुत्रांना प्राधान्य देण्याबाबत आग्रही आहेत. भूमिपुत्रांनी पुढे येऊन ही कामे करावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

मराठी माणसाने व्यवसाय करावा, यासाठी अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती यांनी ‘चला उद्योजक होऊ या’ ही मोहीम हाती घेतली आहे. भरपूर कामे असून कोणीही बेरोजगार राहणार नाही, असे नाकती यांनी सांगितले. लॉकडाउनमुळे अनेकांच्या नोकरीवर गदा येणार आहे. त्यामुळे निराश न होता मराठी तरुणांनी छोटे-मोठे व्यवसाय करून त्यावर मात करावी. या परिस्थितीचा जे फायदा घेतील, तेच टिकतील, असेही नाकती म्हणाले.

मराठी तरुणांमध्ये कला-कौशल्याचा विकास करण्यावर भर दिला जाणार असून त्यासाठी योजनाही आखली आहे. ठाणे महापालिकेने फेरीवाला समितीचे सर्वेक्षण करून भूमिपुत्रांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली जाणार असल्याचे मनविसेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी सांगितले. महाराष्ट्रात मराठी माणसालाच प्राधान्य मिळावे, असे आमचे मत आहे. आता चांगली संधी चालून आली आहे. मातृभाषेतून ग्राहकाला एखादी वस्तू पटवून देणे सोपे जाते, असे नौपाडा व्यापारी मंडळाचे अध्यक्ष मितेश शहा यांनी सांगितले. लॉकडाउननंतर कामगारांची गरज लागणार असून भूमिपुत्रांनी या संधीचा फायदा घ्यावा, असेही शहा म्हणाले.

मराठी व्यावसायिकांना मदत करणार!

कोणत्याही कामाची लाज न बाळगता मराठी तरुणांनी या संधीचा फायदा घ्यावा. तसेच, लॉकडाउनमुळे ज्या मराठी मुलांचे व्यवसाय अडचणीत सापडले आहेत, अशांना उभारी घेण्यासाठी मदत करणार असल्याचेही पाचंगे यांनी सांगितले.

Web Title:  This is the time for employment; Hands clasped for Bhumiputra's employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.