इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 10:06 IST2026-04-27T10:06:06+5:302026-04-27T10:06:41+5:30
इराणसोबतच्या संभाव्य करारासाठी पाकिस्तानात जाणारे अमेरिकन शिष्टमंडळ रद्द केल्याच्या काही मिनिटांतच इराणने 'अधिक चांगली' ऑफर दिल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.

इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
इस्लामाबाद - अमेरिकेशी चर्चा होण्याआधीच पाकिस्तान सोडून ओमानला गेलेले इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची रविवारी अचानक पुन्हा इस्लामाबादमध्ये परतले. शनिवारी ते संध्याकाळी उशीरा ओमानला रवाना झाले होते.
रविवारी ते इस्लामाबादमध्ये पुन्हा का आले याची अधिकृत माहिती इराणने दिलेली नाही. पण आता अराघची रशियाला जात आहेत. ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन वा अन्य वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याचे समजते. दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविराम चर्चा पुन्हा रुळावर आणण्यासाठी पाकिस्तानचे राजकीय आणि लष्करी नेतृत्व आता निकराचे प्रयत्न करत आहे. रविवारी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असिफ मुनीर यांनी पुन्हा इराणच्या काही नेत्यांशी संपर्क साधला.
'इराणची नवी ऑफर'
इराणसोबतच्या संभाव्य करारासाठी पाकिस्तानात जाणारे अमेरिकन शिष्टमंडळ रद्द केल्याच्या काही मिनिटांतच इराणने 'अधिक चांगली' ऑफर दिल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. इराणने सुरुवातीला जो प्रस्ताव दिला, तो समाधानकारक नव्हता. त्यामुळे त्यांनी तातडीने अमेरिकन शिष्टमंडळाचा पाकिस्तान दौरा रद्द केला. मात्र मी दौरा रद्द केल्याच्या अवघ्या १० मिनिटांत इराणकडून नवीन प्रस्ताव आला, जो आधीच्या तुलनेत सरस होता. ही एक मनोरंजक गोष्ट घडल्याचे ट्रम्प म्हणाले. इराणला चर्चा करायची असेल तर त्यांनी आता आमच्याशी बाेलावे. आमचे सर्व पत्ते तयार आहेत. त्यांना हवे असेल तर फाेनवरही चर्चा हाेऊ शकते. १७ तास प्रवास करुन प्रतिनिधी पाठवण्याची गरज नाही असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.