Injured Lungi Ngidi Green Corridor IPL 2026: आयपीएलमध्ये शनिवारी खेळल्या गेलेल्या दिल्ली आणि पंजाब सामन्यादरम्यान गंभीर जखमी झालेला दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी याला 'ग्रीन कॉरिडॉर' तयार करून रुग्णवाहिकेने अवघ्या ११ मिनिटांत बीएलके-मॅक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयात पोहोचवण्यात आले.
दिल्ली वाहतूक पोलिस उपायुक्तांनी सांगितले की, सामन्यादरम्यान आयोजकांकडून त्यांना माहिती मिळाली की, एन्गिडीला तातडीने वैद्यकीय मदतीची गरज आहे. त्यानंतर एसीपी ट्रॅफिक (सेंट्रल डिस्ट्रिक्ट) संजय सिंह यांनी पोलिस नियंत्रण कक्षाशी समन्वय साधून रुग्णवाहिकेच्या विनाअडथळा प्रवासासाठी त्वरित ग्रीन कॉरिडॉर तयार करण्याचे निर्देश दिले.
रुग्णालयातून सुटी; गंभीर इजा नाही
एन्गिडीला शनिवारी रात्री उशिरा रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तपासणीत त्याच्या पाठीच्या कण्याला किंवा मेंदूला कोणतीही गंभीर दुखापत झाल्याचे आढळले नाही. मात्र, डॉक्टरांनी त्याला सध्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. रुग्णालयात न्यूरो सर्जनच्या देखरेखीखाली एन्गिडीच्या चाचण्या आणि सीटी स्कॅन करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की, त्याच्या पाठीच्या कण्याला आणि डोक्याला कोणतीही अंतर्गत इजा नाही. काही तास निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर एन्गिडीची प्रकृती स्थिर आढळली, त्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले. दरम्यान, सोमवारच्या पुढील सामन्यात त्याचे खेळणे अशक्य आहे. त्याच्या जागी ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल स्टार्कचा संघात समावेश केला जाऊ शकतो स्टार्क तंदुरुस्तीअभावी सुरुवातीच्या सामन्यांमध्ये उपलब्ध नव्हता.
'ग्रीन कॉरिडॉर' म्हणजे काय?
- 'ग्रीन कॉरिडॉर' हा एक विशेष मार्ग आहे, जो सामान्यतः अवयव प्रत्यारोपणासाठी रस्ता वाहतूकमुक्त करतो.
- हा मार्ग मानवी हस्तक्षेपाने संचालित केला जातो. भारतात ही संकल्पना २०१४ पासून प्रचलित आहे.
दुखापत कशी झाली?
विजयासाठी २६५ धावांचा पाठलाग करणाऱ्या पंजाबच्या डावातील तिसऱ्या षटकात कर्णधार अक्षर पटेलच्या चेंडूवर प्रियांश आर्यने मारलेल्या फटक्यावर मिड-ऑफला उभा असलेला एन्गिडी झेल घेण्यासाठी मागे धावला. परंतु, त्याला चेंडूचा अचूक अंदाज आला नाही आणि संतुलन बिघडल्यामुळे तो खाली पडला. यामुळे त्याचा खांदा आणि डोके जोरात जमिनीवर आदळले. मैदानावर पडताच एन्गिडीने लगेच आपले डोके धरले आणि काही वेळ तो जमिनीवरच निपचित पडून होता.