बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 12:49 IST2026-04-27T12:47:27+5:302026-04-27T12:49:50+5:30

चेहऱ्याला केक लावल्याचा रागातून एकाचवेळी तीन जणांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.

Bulandshahr Triple Murder BJP Councillor Brothers and Nephew Shot Dead During Birthday Party Over Cake Dispute | बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या

बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या

UP Crime:उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये शनिवारी मध्यरात्री एका वाढदिवसाच्या पार्टीत रक्ताचा थरार पाहायला मिळाला. चेहऱ्याला केक लावल्यासारख्या शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून गोळीबार झाला. यामध्ये भाजप सभासदाचा भाऊ, चुलत भाऊ आणि पुतण्या अशा एकाच कुटुंबातील तिघांची जागीच हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

नेमकी घटना काय?

खुर्जा येथील आरजेएस फिटनेस जिममध्ये शनिवारी रात्री बसपाचा माजी नगर अध्यक्ष जीतू सैनी याच्या वाढदिवसाची पार्टी सुरू होती. या पार्टीत भाजप सभासद संजय सैनी यांचा भाऊ मनीष सैनी (३०), चुलत भाऊ अमरदीप (३२) आणि पुतण्या आकाश (१९) सहभागी झाले होते. रात्री १२ च्या सुमारास, अमरदीपने बर्थडे बॉय जीतू सैनीच्या चेहऱ्याला केक लावला. याच गोष्टीचा जीतूला राग आला आणि तिथेच वादाची ठिणगी पडली.

अंधाधुंध गोळीबार अन् जागीच मृत्यू

वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापलेल्या जीतू सैनी आणि त्याच्या साथीदाराने पिस्तुलातून तिघांवर अंधाधुंध गोळीबार केला. मनीष, आकाश आणि अमरदीप यांना गोळ्या लागल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे, आरोपींनी पळून जाण्यापूर्वी पुराव्यासाठी जिममधील सीसीटीव्हीचा डीव्हीआरदेखील सोबत नेला.

एकाच वेळी तीन चिता पेटल्या

रविवारी संध्याकाळी कडेकोट पोलीस बंदोबस्तात तिन्ही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच कुटुंबातील तीन तरुणांच्या चिता एकाच वेळी पेटताना पाहून उपस्थितांना अश्रू अनावर झाले. मनीषच्या पश्चात दोन लहान मुली आहेत, तर अमरदीपच्या मागे ५ वर्षांचा मुलगा आणि ३ वर्षांची मुलगी आहे. आम्हाला रक्ताच्या बदल्यात रक्त हवे आहे, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा, अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली.

पोलीस कारवाई आणि चकमक

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी एसआयटी स्थापन केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास वेगाने सुरू केला आहे. सोमवारी सकाळी मुख्य आरोपी मयंक सैनीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला शस्त्र जप्त करण्यासाठी नेले असता, त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या चकमकीत पोलिसांनी मयंकच्या पायावर गोळी झाडली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर जीतू सैनी हा अद्याप फरार असून पोलीस त्याच्या शोधात ८ पथके रवाना केली आहेत.

जुना वाद ठरला कारण?

केवळ केक लावल्यावरून ही हत्या झाली की त्यामागे काही जुने वैमनस्य होते, याचाही पोलीस तपास करत आहेत. स्थानिकांच्या मते, एका सैनी धर्मशाळेच्या वादावरून दोन्ही कुटुंबांत आधीपासूनच तणाव होता. त्यातच या पार्टीतील वादाने तेल ओतण्याचे काम केले आणि तिघांना आपला जीव गमवावा लागला.

Web Title : केक विवाद में खूनी खेल: जन्मदिन पार्टी में तीन की हत्या

Web Summary : यूपी में जन्मदिन की पार्टी में केक को लेकर हुए विवाद में बीजेपी सदस्य के तीन रिश्तेदारों की हत्या कर दी गई। पुलिस संभावित भूमि विवाद की जांच कर रही है।

Web Title : Cake fight turns deadly: Three killed at birthday party.

Web Summary : In UP, a birthday party turned tragic when a cake-related argument led to the murder of three relatives of a BJP member. Police are investigating a possible land dispute as the underlying cause.