‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 11:53 IST2026-04-27T11:52:58+5:302026-04-27T11:53:35+5:30
दहशतवादी कारवायांमध्ये सिमकार्ड वापरल्याचा आराेप; मुंबई पाेलिसांच्या नावाने १.१० कोटी लुटले

AI Generated Image
मुंबई - घाटकोपर परिसरात सायबर भामट्यांच्या ‘डिजिटल अरेस्ट’च्या जाळ्यात अडकून एका कुटुंबाची तब्बल १ कोटी १० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. सायबर भामट्यांनी स्वतःला पोलिस अधिकारी भासवून वृद्ध व्यक्ती व त्यांच्या कुटुंबाला धमकावत १८ दिवस घरातच कोंडून ठेवले होते.
घाटकोपर परिसरात ४७ वर्षीय तक्रारदार वयाेवृद्ध आईवडिलांसोबत राहतात. ५ एप्रिल रोजी तक्रारदारांच्या वडिलांना एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला. समोरच्या व्यक्तीने स्वतःला मुंबई पोलिस मुख्यालयातील अधिकारी असल्याचे सांगत, त्यांच्या आधारकार्डचा वापर करून दहशतवादी कारवायांमध्ये सिमकार्ड वापरल्याचा आरोप केला. तसेच लखनौ येथील एटीएस कार्यालयात गुन्हा दाखल असल्याचे सांगून तातडीने सहकार्य करण्यास भाग पाडले. यानंतर आरोपींनी व्हिडीओ कॉलद्वारे पोलिस वर्दीतील व्यक्ती दाखवून विश्वास संपादन केला आणि त्यांना लुटीच्या जाळ्यात ओढले. अटक हाेण्याच्या भीतीपाेटी कुटुंबियांना ऑनलाइन लुटण्यात आले.
भामट्यांकडून बनावट कागदपत्रांचा वापर
पुढील काही दिवसांत आरोपींनी व्हॉट्सॲप आणि सिग्नल ॲपद्वारे सर्वोच्च न्यायालय आणि रिझर्व्ह बँकेच्या नावाने बनावट कागदपत्रे पाठविली. ‘ॲसेट सीझर ऑर्डर’ आणि ‘वॉरंट ऑफ अरेस्ट’ अशा शीर्षकाखालील पत्रे दाखवून प्रकरण निकाली काढण्यासाठी मोठी रक्कम भरण्याची मागणी करण्यात आली.
१५ ते १७ एप्रिलदरम्यान तक्रारदारांनी वडिलांच्या विविध बँक खात्यांतून चेकद्वारे एकूण १ कोटी १० लाख रुपये वेगवेगळ्या खात्यांमध्ये हस्तांतरित केले. प्रत्येक व्यवहारानंतर बनावट पावत्या पाठवून विश्वास टिकवून ठेवण्यात आला.
ऑनलाइन लेख वाचला अन्...
एका ऑनलाईन लेखातून ‘डिजिटल अरेस्ट’ बद्दल माहिती मिळाल्यानंतर ही फसवणूक असल्याचे लक्षात आले. २२ एप्रिल रोजी सायबर हेल्पलाईन १९३० वर तक्रार नोंदविण्यात आली. तोपर्यंत ५ ते २२ एप्रिलदरम्यान ते सायबर भामट्यांना सांगून सर्व गोष्टी करत होते. १८ दिवस ते घराबाहेरही पडले नाहीत. नैसर्गिक विधीला जाण्यासाठीही त्यांची परवानगी घेऊन जात होते.
‘गुप्त तपास’
कुटुंबीयांना घराबाहेर न जाण्याची, कोणालाही माहिती न देण्याची आणि सतत संपर्कात राहण्याची सक्ती करण्यात आली. भीतीचे वातावरण निर्माण करून ‘तपास गुप्त आहे’ असे सांगत आर्थिक व्यवहारांची माहितीही घेतली.