बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 10:45 IST2026-04-27T10:43:48+5:302026-04-27T10:45:44+5:30
इतरांनी या कृती ऑपरेटरद्वारे नियंत्रित होत्या की एखाद्या कार्यक्रमाचा भाग म्हणून पूर्वनियोजित होत्या, असा प्रश्न विचारला आहे.

बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
बीजिंग : चीनमधील एका विद्यापीठाच्या नृत्य कार्यक्रमात अजब घटना घडली. त्यानंतर संपूर्ण जग थक्क झाले आहे. नृत्य सादर करणाऱ्या एका मानवाकृती रोबोने अचानक एका विद्यार्थिनीला मिठी मारल्याने खळबळ उडाली. उपस्थित चकित झाले, तर कर्मचाऱ्यांनी रोबोला बाजूला केले. यामुळे रोबोकडून मानवाला होणाऱ्या धोक्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
ऑनलाइन चर्चेला आला ऊत
रोबोच्या या अनपेक्षित वागणुकीची ऑनलाइन चर्चा सुरू आहे. काही नेटकऱ्यांनी रोबोमध्ये स्वतंत्र जाणीव विकसित झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. तर इतरांनी या कृती ऑपरेटरद्वारे नियंत्रित होत्या की एखाद्या कार्यक्रमाचा भाग म्हणून पूर्वनियोजित होत्या, असा प्रश्न विचारला आहे. हे पूर्वनियोजित नव्हते असे विद्यापीठ कर्मचाऱ्याने स्पष्ट केले. रोबोकडून चूक झाली, तेव्हाच आम्हाला समजले. ही चूक एआय प्रोग्राममधील बिघाडामुळे झाली होती. या कार्यक्रमाद्वारे उपक्रमांत नावीन्य आणण्याचा एक प्रयत्न होता, असे सांगण्यात आले.
रोबोचा स्वतंत्र विचार की तंत्रज्ञानातील चूक, यावर चर्चा
चीनच्या शानक्सी प्रांतातील विद्यापीठात आयोजित या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जगभरात मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. रोबो हे वर्तन स्वतःहून शिकला की, तो ऑपरेटरद्वारे नियंत्रित होताे, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.