गणेश नाईक-एकनाथ शिंदे यांच्यात वाद चिघळला; नरेश म्हस्केंचं खुलं आव्हान, रवींद्र चव्हाणांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 17:37 IST2026-01-27T17:37:13+5:302026-01-27T17:37:50+5:30

एखाद्या व्यक्तीवरचा राग समजू शकतो परंतु त्यासाठी पक्ष, पक्षीय भूमिका, पक्षाचा अजेंडा या सगळ्या बाबी धुडकावून लावत गणेश नाईक आमचे नामोनिशाण मिटवण्याचे वक्तव्य करीत आहेत असं म्हस्के यांनी म्हटलं.

The dispute between Ganesh Naik and Eknath Shinde escalated; Naresh Mhaske open challenge, letter to BJP State President Ravindra Chavan | गणेश नाईक-एकनाथ शिंदे यांच्यात वाद चिघळला; नरेश म्हस्केंचं खुलं आव्हान, रवींद्र चव्हाणांना पत्र

गणेश नाईक-एकनाथ शिंदे यांच्यात वाद चिघळला; नरेश म्हस्केंचं खुलं आव्हान, रवींद्र चव्हाणांना पत्र

नवी मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील वाद चिघळला आहे. शिवसेनेला धोबीपछाड देण्यापासून एकनाथ शिंदे यांचा टांगा पलटी करण्याची विधाने करून नाईक चर्चेत आले आहेत. त्यात आता खासदार नरेश म्हस्के यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्र लिहून गणेश नाईकांना खुलं आव्हान दिले आहे. शिवसेनेचे नामोनिशाण मिटवून टाकण्याची परवानगी द्यावीच, आमची तयारी आहे असं म्हस्के यांनी पत्रात म्हटलं.

नरेश म्हस्के यांनी पत्रात म्हटलं की, नवी मुंबईतील ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी आपले मित्र पक्ष असलेल्या राज्य आणि अनेक महानगरपालिका नगरपालिकांमध्ये सत्तेत सहभागी असलेल्या, युती म्हणून लढून युती म्हणून जिंकून आलेल्या शिवसेनेला संपवण्याचा विडा उचलला आहे. एकेकाळी स्वतः शिवसैनिक असलेल्या गणेश नाईक यांनी आमचे प्रमुख नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अनेक वेळा डिवचून नवी मुंबईतून शिवसेनेला धोबीपछाड देण्याचे, टांगा पलटी करण्याचे आणि शिवसेनेला नवी मुंबईतून मुळातून संपवून टाकण्याचे स्पष्ट इरादे अनेक प्रसारमाध्यमातून जाहीर रित्या मांडले आहेत. आता तर त्यांनी जाहीरपणे पक्षाने परवानगी दिली तर शिवसेनेचे नामोनिशाण मिटवून टाकू असं बेताल वक्तव्य केले. मी तमाम शिवसैनिकांच्या वतीने आणि शिवसेना पक्षाच्या वतीने विनंती करतो की त्यांच्या ह्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना शिवसेनेचे नामोनिशाण मिटवून टाकण्याची परवानगी द्यावीच. आमची तयारी आहे असं त्यांनी म्हटलं. 

तसेच महाराष्ट्रात महाबिघाडीची सत्ता उलथवून टाकण्यात भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे या दोघांची मोठी भूमिका राहिली आहे. त्यानंतरच युतीचे सरकार महाराष्ट्रात येऊ शकले आणि आज कल्याण डोंबिवली, ठाणे, मुंबई या ठिकाणी युती म्हणून लढत देऊन महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुकात आपण मोठे यश मिळवले आहे. या सर्व निर्णयांमध्ये आपली ही सक्रिय भूमिका राहिली आहे. सगळीकडे युती असताना युतीतल्या मोठ्या घटक पक्षाबद्दल असे विधान वारंवार करणे म्हणजे आपल्या पक्ष नेतृत्वावरच अविश्वास दाखवण्यासारखे आहे. एखाद्या व्यक्तीवरचा राग समजू शकतो परंतु त्यासाठी पक्ष, पक्षीय भूमिका, पक्षाचा अजेंडा या सगळ्या बाबी धुडकावून लावत गणेश नाईक आमचे नामोनिशाण मिटवण्याचे वक्तव्य करीत आहेत असं सांगत नाईकांवर म्हस्के यांनी आगपाखड केली. 

दरम्यान, मोदींच्या आणि अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस दिवस रात्र काम करीत आहेत. काही बाबतीत विचार वेगळे असले तरी एक हिंदुत्ववादी, राष्ट्रीय विचारांचे स्थिर सरकार आपण त्यामुळेच देऊ शकलो आहोत.  परंतु त्यांना हे बघवत नसल्यानेच कदाचित ते अशी मागणी करत असावेत. धर्मवीर आनंद दिघे असताना गणेश नाईकांना शिवसेनेने कशी धोबीपछाड दिली होती ते त्यांनी एकदा आठवावे. किंबहुना आपण त्यांना त्याचे स्मरण करून द्यावे. बाकी, शिवसेना त्यांच्या प्रत्येक आव्हानाला उत्तर द्यायला सज्ज आहे. आज नवी मुंबईत दहा जागाही शिवसेनेच्या निवडून येऊ शकत नाहीत अशा वल्गना करणाऱ्या गणेश नाईकांना आम्ही ४२ जागा निवडून आणून दाखवले आहे. कदाचित त्यामुळेच त्यांची अस्वस्थता वाढलेली असू शकते. दिवस रात्र लोकांच्यासाठी कार्यरत असणाऱ्या शिंदे साहेबांवर त्यामुळेच त्यांचा राग असू शकतो. तेव्हा त्यांच्या सर्व वक्तव्यांचा सखोल विचार करून त्यावर चिंतन करून आपण त्यांना शिवसेना संपवण्याची जबाबदारी देऊन टाकावीत असं म्हस्के यांनी मागणी केली आहे. 

Web Title : नाईक-शिंदे विवाद बढ़ा; म्हस्के की नाईक को चुनौती, चव्हाण को पत्र।

Web Summary : नाईक-शिंदे संघर्ष गहराया, म्हस्के ने शिवसेना को खत्म करने के नाईक के दावों को चुनौती दी। उन्होंने चव्हाण से शिवसेना को खत्म करने की अनुमति देने का आग्रह किया, और चुनौती के लिए अपनी तत्परता जताई। सत्तारूढ़ गठबंधन में तनाव बढ़ा।

Web Title : Naik-Shinde feud escalates; Mhaske challenges Naik, writes to Chavan.

Web Summary : The Naik-Shinde conflict intensifies as Mhaske challenges Naik's Sena-elimination claims. He urges Chavan to grant Naik permission to eradicate Shiv Sena, asserting their readiness for the challenge. Tensions rise within the ruling coalition.