राजकीय मंडळींनो, ही ठाण्याची संस्कृती नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 07:41 IST2026-05-18T07:41:14+5:302026-05-18T07:41:43+5:30
प्रत्येक महासभेत गोंधळ निर्माण करून प्रशासनाला अडचणीत न आणता आपला स्वार्थ साध्य करण्यासाठी १००% चुकीचे प्रस्ताव अवघ्या काही मिनिटांत मंजूर करून काय साध्य होतंय?

राजकीय मंडळींनो, ही ठाण्याची संस्कृती नाही
- अजित मांडके
मुख्य उपसंपादक
ठाणे महापालिकेत सध्या जे काही सुरू आहे ते पाहून सामान्य ठाणेकर चक्रावून गेला आहे. एकहाती सत्ता संपादित केल्यानंतरही अद्याप सत्ताधारी शिंदेसेनेला स्थायी समिती, स्वीकृत नगरसेवक आणि इतर समित्या स्थापन करता आल्या नाहीत. दुसरीकडे ठाणे महापालिकेच्या सलग तिसऱ्या महासभेत लोकशाहीची लक्तरे वेशीला टांगल्याचा प्रकार पाहायला मिळाला. याचसाठी आम्ही तुम्हाला निवडून दिले होते का? हीच का ठाण्याची राजकीय संस्कृती? असे सवाल उपस्थित होत आहेत. प्रत्येक महासभेत गोंधळ निर्माण करून प्रशासनाला अडचणीत न आणता आपला स्वार्थ साध्य करण्यासाठी १००% चुकीचे प्रस्ताव अवघ्या काही मिनिटांत मंजूर करून काय साध्य होतंय?
णे महापालिकेत शिंदेसेनेने ७५ नगरसेवक निवडून आणत एकहाती सत्ता संपादित केली. निवडणुकीत शिंदेसेना, भाजप महायुतीत लढली आणि सत्तेतही एकत्रित सहभागी झाली. शिंदेसेनेला महापौरपद, तर भाजपच्या वाटेला उपमहापौरपद आले आहे. ठाण्याच्या विकासाचा मार्ग मोकळा होईल, मुबलक पाणी मिळेल, वाहतूक कोंडीमुक्त ठाणे होईल, मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध होतील, फुटपाथ रिकामे होतील, कचऱ्याचे ढीग कमी होतील असे वाटणाऱ्या ठाणेकरांच्या नशिबी यापैकी काहीही आलेले नाही. पहिल्या महासभेपासून तिसऱ्या महासभेतही शिंदेसेना विरुद्ध भाजप कलगीतुरा सुरूच आहे. एकहाती सत्ता संपादित केल्यानंतरही स्थायी समिती, स्वीकृत नगरसेवक आणि इतर समित्या अद्याप गठित होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे स्थायी समितीचे विषय महासभेत येत आहेत.
विशेष म्हणजे तीन वर्षांच्या प्रशासकीय काळातील कामाचा हिशोब भाजप आणि विरोधी बाकांवरील नगरसेवकांनी मागितला आहे. त्याचे उत्तर प्रशासन किंवा सत्ताधाऱ्यांकडेही नाही. त्यामुळे प्रशासकीय काळात झालेले ठराव आता महासभेत आणून एक प्रकारे प्रशासनाला पाठीशी घालण्याची मोठी चूक सत्ताधारी करीत आहेत का? अशी शंका येण्यासारखी स्थिती आहे. युतीत लढलेला भाजप विरोधी पक्षाची भूमिका बजावू लागला आहे. ‘जर तुम्हाला एकत्र चूल पेटवायचीच नव्हती तर युतीत का लढलात’ असे विचारले तर त्याचे उत्तर कोण देणार? यात दोघेही दोषी आहेत.
एकाही प्रस्तावावर चर्चा न करता केवळ गोंधळ निर्माण करून प्रत्येक महासभेत २५० ते ३०० प्रस्ताव हातोहोत मंजूर केले जात आहेत. यातून सत्ताधारी कोणाची पाठराखण करत आहेत? की टक्केवारीचे राजकारण सुरू आहे? महापालिकेच्या सभागृहात होणारा गोंधळ शोभनीय नाही.
महासभेचे थेट प्रक्षेपण व्हावे, अशी मागणी ठाणेकरांसह विरोधी पक्षाने केली आहे. त्याला बगल दिली जात आहे. दुसरीकडे एकहाती सत्ता संपादित केल्यानंतरही शिंदेसेनेला त्याचा फायदा सत्ता चालविताना होत नसल्याचे चित्र आहे. महासभेत भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार), शरद पवार आणि एमआयएमही शिंदेसेनेला वरचढ ठरत आहे. प्रत्येक महासभेत होणारा गोंधळ शोभनीय नसून ही ठाण्याची संस्कृती नाही.