दुबेच्या साथीदारांना विमानाने लखनऊला न्या, एन्काउंटरच्या धास्तीने न्यायालयास विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 02:34 IST2020-07-13T02:34:21+5:302020-07-13T02:34:52+5:30

दुबे याचे साथीदार अरविंद त्रिवेदी ऊर्फ गुड्डन रामविलास त्रिवेदी (४६) आणि सुशीलकुमार ऊर्फ सोनू सुरेश तिवारी (३०) या दोघांना मुंबईच्या दहशतवादविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने ठाण्यातून ११ जुलै रोजी अटक केली.

Dubey's accomplices airlifted to Lucknow, court requested | दुबेच्या साथीदारांना विमानाने लखनऊला न्या, एन्काउंटरच्या धास्तीने न्यायालयास विनंती

दुबेच्या साथीदारांना विमानाने लखनऊला न्या, एन्काउंटरच्या धास्तीने न्यायालयास विनंती

ठाणे : उत्तर प्रदेशमधील कुख्यात गुंड विकास दुबे याच्या एन्काउंटरचा पूर्वानुभव लक्षात घेता, ठाण्यात पकडलेल्या दुबे याच्या दोन्ही साथीदारांना साध्या वाहनाऐवजी विमानाने लखनऊ येथे नेण्यात यावे, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी ठाणे न्यायालयात रविवारी केली. दरम्यान, या दोघांनाही २१ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
दुबे याचे साथीदार अरविंद त्रिवेदी ऊर्फ गुड्डन रामविलास त्रिवेदी (४६) आणि सुशीलकुमार ऊर्फ सोनू सुरेश तिवारी (३०) या दोघांना मुंबईच्या दहशतवादविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने ठाण्यातून ११ जुलै रोजी अटक केली. त्यांना रविवारी ठाण्याच्या विशेष सत्र न्यायालयासमोर पोलिसांनी हजर केले. न्यायाधीश रश्मी झा यांनी या दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली. उत्तर प्रदेश पोलीस त्यांचा ताबा घेण्यासाठी येईपर्यंत त्यांना नवी मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात ठेवले जाणार आहे.
दरम्यान, दोघांनाही कानपूरला नेण्यासाठी वाहनाऐवजी विमानाने लखनऊपर्यंत न्यावे, अशी मागणी आरोपी त्रिवेदी आणि तिवारी यांचे वकील अनिल जाधव यांनी ठाणे न्यायालयात अर्जाद्वारे केली. त्यांची कोरोना तपासणीही केली जाणार आहे. त्यानंतर, त्यांचा ताबा उत्तर प्रदेश पोलिसांना दिला जाणार असल्याची माहिती दया नायक यांनी दिली. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये झालेल्या आठ पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्या प्रकरणात विकास दुबे हा मोस्ट वॉण्टेड होता. तो पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत मारला गेल्यानंतर त्याचे साथीदार पसार झाले होते.
विकास दुबेला नेताना वाहनाला झालेला अपघात, तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आरोपींच्या मनात भीती आहे. त्यामुळेच आरोपींना विमानाने लखनऊला घेऊन जाण्याची विनंती ठाणे न्यायालयाकडे केल्याचे अ‍ॅड. जाधव यांनी सांगितले.

Web Title: Dubey's accomplices airlifted to Lucknow, court requested