Coronavirus : केडीएमसीतही नागरिकांना येण्यास मज्जाव, अपवादात्मक परिस्थितीतच प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 01:43 AM2020-03-19T01:43:55+5:302020-03-19T01:44:51+5:30

कोरोनाचा प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून महापालिका मुख्यालय तसेच प्रभाग समिती कार्यालयांमध्ये कामानिमित्त येणा-या नागरिकांना आणि अभ्यागतांना ३१ मार्चपर्यंत पुढील आदेश होईपर्यंत येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Coronavirus: citizens are not allowed to enter in KDMC | Coronavirus : केडीएमसीतही नागरिकांना येण्यास मज्जाव, अपवादात्मक परिस्थितीतच प्रवेश

Coronavirus : केडीएमसीतही नागरिकांना येण्यास मज्जाव, अपवादात्मक परिस्थितीतच प्रवेश

Next

कल्याण : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केडीएमसीनेही तक्रारी, समस्या आणि अन्य कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना महापालिकेच्या कार्यालयांमध्ये येण्यास मज्जाव केला आहे. कर आणि अन्य देयकांसाठी ऑनलाइन सेवेचा वापर करा, असे आवाहन केले असून नागरिकांच्या कामकाजासाठी कार्यालयातील विभागनिहाय संपर्क अधिकाऱ्यांचे दूरध्वनी आणि ई-मेलचा समावेश असलेले जाहीर फलक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावले आहेत.

कोरोनाचा प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून महापालिका मुख्यालय तसेच प्रभाग समिती कार्यालयांमध्ये कामानिमित्त येणा-या नागरिकांना आणि अभ्यागतांना ३१ मार्चपर्यंत पुढील आदेश होईपर्यंत येण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, अपवादात्मक परिस्थितीत कामकाजाच्या आवश्यकतेनुसार महापालिका कार्यालयात येणे आवश्यक असल्यास नागरिकांनी संबंधित विभागप्रमुखांची स्वाक्षरी असलेली लेखी परवानगी अथवा पास नावासह दिला तरच विशेष बाब म्हणून त्यांना प्रवेश दिला जाईल. महापालिकेच्या कर व अन्य देयकांसाठी नागरिकांनी आॅनलाइन सेवेचा वापर करावा, पण आॅफलाइन कर व अन्य भरणा करावयाचा असल्यास संबंधितांना महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात प्रवेश देण्याची कार्यवाही सुरक्षा विभागामार्फत करण्यात येईल, असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काढलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे. महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाºयांचे दूरध्वनी क्रमांक व ई-मेल आयडी जाहीर केले असून त्यांच्याशी संपर्क साधून गर्दी टाळावी, असे आवाहनही सूर्यवंशी यांनी केले आहे.

‘त्यांनी’ मास्क घालावा
ज्या नागरिकांना अपवादात्मक परिस्थितीत प्रवेश दिला जाईल. त्यांनी मास्क परिधान करणे आवश्यक आहे. महापालिका मुख्यालयात प्रवेश केल्यानंतर स्वच्छतागृहामध्ये जाऊन सॅनिटायझरचा वापर करावा अथवा साबणाने/हॅण्डवॉशने हात स्वच्छ धुऊन नंतरच कार्यालयातील संबंधित अधिकारी आणि कर्मचाºयांकडे जाण्याबाबत सुरक्षा कर्मचाºयांनी समक्ष सूचना द्याव्यात. तसेच कामकाज पूर्ण झाल्यावर संबंधित नागरिकाला लागलीच कार्यालय सोडण्याबाबत सूचना द्याव्यात. तो नागरिक जास्त वेळ विभागात रेंगाळणार नाही, याची दक्षता बोलावणाºया अधिकाºयाने घ्यावयाची आहे. मुख्यालयातील अधिकाºयांनी त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या उपविभागातील अधिकारी/कर्मचाºयांना अनावश्यक कामकाजासाठी मुख्यालयात बोलवू नये, अशा मोलाच्या सूचनाही केल्या आहेत.

संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखणे गरजेचे - केडीएमसीच्या कार्यालयांमध्ये दैनंदिन व वैयक्तिक कामांसाठी नागरिक तसेच अन्य सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, कंत्राटदार आणि त्यांच्या कर्मचाºयांनी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. कोरोनाचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्याच्या उपाययोजनांसंबंधी राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार ३१ मार्चपर्यंत महापालिकेच्या कार्यालयांमध्ये संबंधितांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.

परदेशातून येणा-यांसाठी होम क्वारंटाइनसंदर्भात मार्गदर्शन
कल्याण : परदेशातून येणाºया नागरिकांची माहिती दिल्यास त्यांना होम क्वॉरंटाइन करण्याचा सल्ला देऊ न मार्गदर्शन केले जाईल, अशी माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. परदेशातून येणाºया नागरिकांना क्वॉरंटाइन करण्यासाठी पश्चिमेकडील वसंत व्हॅली येथे व्यवस्था करण्यात आली असून अन्य दोन ठिकाणी व्यवस्था करण्याचे प्रस्तावित असल्याची माहितीही सूर्यवंशी यांनी पदाधिकाºयांना दिली.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर महापौर विनीता राणे यांनी बुधवारी महापौर दालनात विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीला आयुक्त सूर्यवंशी यांनी ही माहिती दिली. बैठकीला सभागृहनेते प्रकाश पेणकर, महिला बालकल्याण समितीच्या सभापती वीणा जाधव, शिवसेनेचे गटनेते दशरथ घाडीगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते संतोष तरे, काँग्रेसच्या गटनेत्या दर्शना शेलार, मनसे गटनेते मंदार हळबे, ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे तसेच महापालिकचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजू लवंगारे आणि अन्य वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
पानटपºया आणि खाद्यपदार्थांच्या हातगाड्या खबरदारीचा उपाय म्हणून काही कालावधीसाठी बंदी घालावी, अशी सूचना शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे आणि अन्य पदाधिकाºयांनी केली. याबाबत प्रशासन आवश्यक ती कारवाई करेल, असे आश्वासन आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी दिली. सरकारने बुधवारी टपºया बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाने कोरोना जनजागृती आणि खबरदारीसंदर्भात माहितीपत्रके उपलब्ध करून दिल्यास जनजागृती केली जाईल, असे नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्याकडून आयुक्तांना सांगण्यात आले. यावर आयुक्त सूर्यवंशी यांनी याबाबतची माहिती पत्रके पुरवण्याबाबत संबंधित अधिकाºयांना निर्देश दिले.
केडीएमसी परिक्षेत्रात आतापर्यंत तीन रु ग्णांना कोरोनाची लागण झालेली असून सध्या या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

१७ हजार लोकांचे केले सर्वेक्षण
रु ग्ण राहत असलेल्या परिसरात सर्वेक्षण करण्यासाठी वैद्यकीय अधिकाºयांच्या नियंत्रणाखाली १८ आरोग्य कर्मचाºयांचे पथक तयार केले असून हे सर्वेक्षण पुढील १४ दिवसांपर्यंत नियमित स्वरूपात करण्यात येणार आहे. आतापर्यंत सुमारे १७ हजार लोकसंख्येचे सर्वेक्षण केल्याची माहितीही आयुक्त सूर्यवंशी यांनी उपस्थित पदाधिकाºयांना दिली.

Web Title: Coronavirus: citizens are not allowed to enter in KDMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.