O uncle ... not the asphalt; | ओ काका... डांबरी नव्हे, खडीच्या रस्त्यामुळे उडणाºया धुळीतून गाठतोय शाळा बरं का...!
ओ काका... डांबरी नव्हे, खडीच्या रस्त्यामुळे उडणाºया धुळीतून गाठतोय शाळा बरं का...!

ठळक मुद्देआयएमएस स्कूल ते सैफुलपर्यंतच्या रस्त्यावर खड्डेच खड्डेवाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहेझोन कार्यालयाने हे खड्डे बुजविण्याची तसदी घेतली नाही

सोलापूर : घंटा वाजली... शाळा सुटली... गेटमधून पटापटा मुले बाहेर पडली... ये चल ना... थांब रे प्रथम सायकल घेऊन येतो... एवढ्यात विद्यार्थ्यांना घरी पोहोचविण्यासाठी भराभरा शाळेच्या मुलांची वाहतूक करणाºया गाड्यांचा ताफा निघाला... एवढ्यात सायकलवरून येणाºया एका विद्यार्थ्याला लोकमतच्या छायाचित्रकारास पाहून ओ... काका, डांबरी नव्हे बरं का, खडीच्या रस्त्यामुळे उडत असलेल्या धुळीतून गाठतोय शाळा बरं का... असं म्हणत तो विद्यार्थी भुरकन निघून गेला.

आयएमएस स्कूल ते सैफुलपर्यंतच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत. त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे़ जुळे सोलापुरातील ड्रेनेजलाईनचे काम पूर्ण झाल्यावर ड्रेनेज कनेक्शन देण्याच्या कामास सुरुवात झाली. त्यावेळी नागरिकांनी झोन कार्यालयाकडे ड्रेनेज कनेक्शनचे शुल्क भरून खड्डे खोदले, पण झोन कार्यालयाने हे खड्डे बुजविण्याची तसदी घेतली नाही. तत्कालीन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी ड्रेनेजसाठी खड्डे मारले असतील तर त्या शुल्कातून सिमेंटने खड्डे भरून घ्यावेत, अशी सूचना केली. आयुक्त पाहणीसाठी येणार म्हटल्यावर काही खड्डे सिमेंटने भरून घेण्यात आले. नंतर वाळू वाहतुकीमुळे रस्ता खचून खड्डे वाढत गेले.

आयएमएस स्कूल ते सैफुलपर्यंतच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवात महापालिकेने या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले. ठेकेदाराने रुंदीकरण करताना एकाच बाजूने साईडपट्टी वाढविली. त्यानंतर गणपती व त्यानंतर देवीच्या मंडपामुळे हा भाग सोडून पुढील काम सुरू केले. दरम्यान, नवरात्रीपासून पाऊस सुरू झाल्यावर काम बंद करण्यात आले. सततच्या पावसामुळे हे काम बंद पडले. आता पाऊस बंद होऊन पंधरवडा उलटला तरी महापालिकेला रस्त्याचा ठेकेदार कोण हेच समजले नसल्याचे नागरिकांनी सांगितले. या ठेकेदाराने अंथरलेल्या खडीवरून कसरत करीत नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. यात कहर म्हणजे ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे तो भाग काढून त्या ठिकाणी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. खड्डे तसेच अन् खडी बाजूला, असे या रस्त्याचे चित्र दिसत आहे. 

मुलांनी सायकल बंद केली
- या रस्त्यावरून दररोज शेकडो मुले सायकलवरून शाळेला ये-जा करतात. पण खडीवरून सायकली घसरून अपघात होऊ लागल्याने पालकांनी त्यांना चालत पाठविणे पसंत केले आहे. याशिवाय विजयपूर महामार्गावरून सैफुल ते जुळे सोलापूरला संपर्क साधण्यासाठी हा रस्ता जवळचा असल्याने वाहनांची मोठी वर्दळ असते. मीरानगरपर्यंत वाहने, महापालिकेच्या बस सुखरूप येतात, पण तिथून पुढे कसरतीचा रस्ता आहे. मधल्या पट्टीवरून जाण्यासाठी वाहनधारकांत स्पर्धा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे दररोज छोटे-मोठ अपघात व भांडणाचे प्रसंग घडत आहेत.

रस्त्याचा विकास करणार
- या रस्त्यावरील वर्दळ लक्षात घेऊन रुंदीकरण करण्यात येत असल्याचे नगर अभियंता संदीप कारंजे यांनी सांगितले. ऐन पावसाळ्यात हे काम हाती घेण्यात आले होते. पावसामुळे हे काम बंद पडले आहे. पण आता पावसाळा गेला तरी काम कधी सुरू होणार, याबाबत नागरिकांत सवाल उपस्थित केले जात आहेत. रुंदीकरणाचे कामही अर्धवट आहे. फक्त मीरानगरपर्यंत एक बाजूची साईडपट्टी भरण्यात आली आहे. त्यातही सातत्य दिसत नाही. मीरानगर ते सत्तूर फूट रोडपर्यंत खड्ड्यांची मालिका दिसत आहे. बिलालनगर ते जाधव निवासपर्यंत रस्त्याच्या मधोमध मोठे खड्डे पडले आहेत. 

या रस्त्यांवरून दररोज हजारो मुले शाळेसाठी ये-जा करतात़ रस्ता खराब असल्यामुळे बहुतांश मुलांच्या पालकांनी मुलांना सायकलवरून शाळेला जाण्यासाठी नकार दिला आहे़ अशातच काही विद्यार्थी हे या रस्त्यावरून ये-जा करीत असताना खड्ड्यात पडून छोटे-मोठे अपघात घडत आहेत़ त्वरित हा रस्ता दुरुस्त करून परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा, एवढीच अपेक्षा़
- वनमाला पाटील
रहिवासी, सिद्धेश्वर पार्क

आयएमएस स्कूल ते सैफुलपर्यंतच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत़ याकडे महापालिकेच्या अधिकाºयांकडून दुर्लक्ष होत आहे़ त्वरित रस्ता करण्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकाºयांनी पुढाकार घ्यावा़ हजारो विद्यार्थी या मार्गावरून ये-जा करीत असतात़ किमान विद्यार्थ्यांचा तरी विचार करून रस्ता दुरुस्तीचे काम हाती घ्यावे़ 
- सरिता जाधव
रहिवासी, आयएमएस स्कूलजवळ

या मार्गावरून जाणाºया जडवाहतुकीमुळे हा रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे़ या रस्त्यावर शेकडो जीवघेणे खड्डे आहेत़ त्यामुळे या रस्त्यावरून जाताना अनेक वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे़ महापालिकेच्या संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, एवढीच अपेक्षा़
- कविता होटकर
रहिवासी, आयएमएस स्कूलजवळ, सोलापूर

Web Title: O uncle ... not the asphalt;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.