तामिळनाडूत सत्तेचं गणित जुळेना, विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाला विलंब, चाहत्यानं स्वत: पेटवून घेतलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 15:32 IST2026-05-09T15:32:00+5:302026-05-09T15:32:40+5:30
Thalapathy Vijay: थलपती विजय यांच्या शपथविधील विलंब होत असल्याने नाराज झालेल्या त्यांच्या चाहत्याने स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना उघडकीस आली.

तामिळनाडूत सत्तेचं गणित जुळेना, विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाला विलंब, चाहत्यानं स्वत: पेटवून घेतलं!
दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके पक्षाने तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला आहे. मात्र, स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे राज्यात सरकार स्थापनेचा तिढा कायम असून, त्यामुळे विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला विलंब होत आहे. शनिवारी नियोजित असलेला शपथविधी समारंभही रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यामुळे नाराज होऊन विजय यांच्या आणखी एका चाहत्याने स्वत:ला पेटवून घेतल्याची माहिती समोर आली.
इसक्कियप्पन असे या तरुणाचे नाव असल्याचे वृत्त आहे. तामिळनाडूमध्ये सरकार स्थापनेवरून वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इसक्कियप्पनने स्वतःला पेटवून घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. गंभीररीत्या भाजलेल्या इसक्कियप्पनला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विजय मुख्यमंत्री बनण्यास होत असलेल्या विलंबामुळे इसक्कियप्पन मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाला. त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, चार महिन्यांपूर्वीही इसक्कियप्पनने विजय मुख्यमंत्री व्हावेत, या इच्छेसाठी नवस म्हणून १६ फूट लांबीचा भाला आपल्या चेहऱ्यातून आरपार टोचून घेतला होता. या घटनांबद्दल चिंता व्यक्त करताना, राजकीय नेत्यांनी ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे वर्णन केले.
तामिळनाडूतील राजकीय अनिश्चिततेमुळे चाहते आक्रमक झाले असून, आत्मदहनासारख्या दुर्दैवी घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर तामिळिसाई सुंदरराजन यांनी अभिनेता आणि राजकीय नेता विजय यांना विशेष विनंती केली आहे. "प्रत्येक नागरिक या प्रक्रियेत भावनिक रित्या गुंतलेला आहे. विजय यांनी आपल्या चाहत्यांना शांत राहण्याचे आणि कोणतेही टोकाचे पाऊल न उचलण्याचे आवाहन करावे," असे सुंदरराजन यांनी म्हटले आहे. राज्यातील शांतता राखण्यासाठी आता विजय काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.