नवीन फोन घेतलाय? मग 'या' ५ सेटिंग्ज लगेच करा; एका चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 15:13 IST2026-05-09T15:13:06+5:302026-05-09T15:13:49+5:30
New Smartphone Settings: डेटा चोरी, बॅटरी ड्रेन आणि हॅकिंगपासून वाचण्यासाठी नवीन फोनमध्ये या ५ गोष्टी नक्की करा.

नवीन फोन घेतलाय? मग 'या' ५ सेटिंग्ज लगेच करा; एका चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान!
नवीन स्मार्टफोन खरेदी करणे हा प्रत्येकासाठी आनंदाचा क्षण असतो. फोन हातात येताच अनेकजण आधी कॅमेरा चेक करतात, गेम्स खेळतात किंवा सोशल मीडिया अॅप्स डाऊनलोड करू लागतात. मात्र, या घाईगडबडीत आपण फोनच्या काही महत्त्वाच्या सुरक्षेच्या सेटिंग्ज करायला विसरतो. हीच छोटीशी चूक भविष्यात डेटा चोरी, बॅटरी लवकर संपणे किंवा बँक अकाउंट हॅक होण्यासारख्या मोठ्या संकटांना निमंत्रण देऊ शकते. जर तुम्हीही नवीन फोन घेतला असेल, तर 'हे' ५ कामं सर्वात आधी करा.
१. सर्वात आधी स्क्रीन लॉक आणि फिंगरप्रिंट सेट करा
अनेकजण नवीन फोन घेतल्यावर काही दिवस तो विना लॉकचा वापरतात. ही सर्वात मोठी चूक ठरू शकते. फोनमध्ये तात्काळ मजबूत पासकोड, फिंगरप्रिंट किंवा फेस लॉक सेट करा. यामुळे तुमचे फोटो, चॅट्स आणि बँकिंग अॅप्स सुरक्षित राहतील. १२३४ किंवा ०००० सारखे सोपे पासवर्ड ठेवणे टाळा.
२. Google किंवा iCloud बॅकअप सुरू करा
फोन खराब होणे किंवा चोरीला जाणे या गोष्टी कधीही सांगून येत नाहीत. त्यामुळे सुरुवातीलाच क्लाउड बॅकअप सुरू करणे आवश्यक आहे. अँड्रॉइड युजर्सनी 'Google Backup' आणि आयफोन युजर्सनी 'iCloud' सुरू करावे. यामुळे तुमचे कॉन्टॅक्ट्स आणि महत्त्वाच्या फाईल्स सुरक्षित राहतात आणि दुसरा फोन घेतल्यावर सहज परत मिळतात.
३. बॅटरी सेटिंग्स ऑप्टिमाइज करा
नवीन फोनमध्ये अनेक अॅप्स बॅकग्राउंडला चालू असतात, ज्यामुळे बॅटरी वेगाने संपते. फोनच्या Settings मध्ये जाऊन 'Battery Optimization' मोड सुरू करा. नको असलेल्या अॅप्सची बॅकग्राउंड अॅक्टिव्हिटी बंद करा. तसेच ऑटो ब्राइटनेस आणि डार्क मोडचा वापर केल्यास बॅटरी लाइफ वाढण्यास मदत होते.
४. सिक्युरिटी आणि प्रायव्हसी तपासा
आजकाल प्रत्येक अॅप कॅमेरा, मायक्रोफोन आणि लोकेशनची परवानगी मागतो. विचार न करता 'Allow' करणे धोकादायक ठरू शकते. प्रायव्हसी सेटिंगमध्ये जाऊन कोणत्या अॅपला काय अॅक्सेस दिला आहे ते तपासा. गरज नसलेल्या अॅप्सच्या परवानग्या त्वरित बंद करा.
५. फोन आणि अॅप्स अपडेट करा
फोन जरी नवीन असला तरी त्यातील सॉफ्टवेअर जुने असू शकते. यामुळे हॅकिंगचा धोका वाढतो. फोन सेटअप केल्यावर लगेच 'Software Update' तपासा आणि सर्व अॅप्स अपडेट करा. नव्या अपडेट्समुळे फोनची कार्यक्षमता सुधारते आणि नवीन सिक्युरिटी पॅचेस मिळतात.
आजच्या काळात स्मार्टफोन केवळ बोलण्याचे साधन नसून ते तुमचे डिजिटल बँक खाते आणि वैयक्तिक डायरी आहे. त्यामुळे सुरुवातीलाच या ५ गोष्टी केल्या तर तुमचा फोन सुरक्षित राहील आणि दीर्घकाळ स्मूद चालेल.