गाडीचा विमा काढणं ही आता केवळ कायदेशीर गरज उरली नसून, ती एक आर्थिक गरज बनली आहे. अनेकदा आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह विमा घेतो, पण ऐन वेळी काही विशिष्ट नुकसानीचा खर्च आपल्या खिशातूनच करावा लागतो. अशा वेळी 'ॲड-ऑन्स' (Add-ons) तुमच्या मदतीला धावून येतात. विम्याच्या मूळ हप्त्यामध्ये थोडी अधिक भर घालून तुम्ही हजारो रुपयांची बचत कशी करू शकता, हे आज आपण पाहणार आहोत.
पाहूया कोणत्या 'ॲड-ऑन्स'चा तुम्ही विचार करू शकता
१. इंजिन प्रोटेक्शन : अतिवृष्टीच्या भागात राहणाऱ्यांसाठी हे वरदान आहे. पाण्यामुळे इंजिन खराब झाल्यास, त्याचा दुरुस्तीचा खर्च खूप मोठा असतो, जो या ॲड-ऑनमुळे कव्हर होतो.
२. रिटर्न-टू-इनव्हॉइस : गाडी चोरीला गेली किंवा अपघातात पूर्ण खराब झाली, तर विमा कंपनी साधारणपणे गाडीची सध्याची बाजारातील किंमत (आयडीव्ही) देते. पण ॲड-ऑन असेल, तर तुम्हाला गाडीच्या खरेदीवेळी बिलावर असलेली पूर्ण किंमत परत मिळते.
मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
३. टायर प्रोटेक्शन : खराब रस्ते किंवा खड्ड्यांमुळे टायर फाटणे, फुगणे किंवा ट्यूब खराब होणे अशा गोष्टी नेहमी घडतात. सामान्य विम्यात हे नुकसान कव्हर होत नाही, पण या ॲड-ऑनमुळे नवीन टायरचा खर्च वाचू शकतो.
४. डेली अलाउन्स : ज्यांना कामानिमित्त रोज गाडी लागते, त्यांच्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे. तुमची गाडी दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये असताना, कंपनी तुम्हाला दररोज ठराविक रक्कम देते, तुमचा टॅक्सी किंवा प्रवासाचा खर्च भागेल.
५. रॉन्ग फ्यूल प्रोटेक्शन : अनावधानानं डिझेल गाडीत पेट्रोल किंवा पेट्रोल गाडीत डिझेल भरले गेल्यास इंजिनचं मोठं नुकसान होऊ शकतं. हा ॲड-ऑन अशा वेळी होणारा दुरुस्तीचा खर्च उचलतो.
६. कन्झ्युमेबल्स कव्हर : अपघातानंतर गाडी दुरुस्त करताना इंजिन ऑइल, नट-बोल्ट, ग्रीस, एअर कंडिशनर गॅस यांसारख्या छोट्या पण महागड्या गोष्टींचा खर्च ग्राहकाला करावा लागतो. या कव्हरमुळे अशा किरकोळ वस्तूंचा खर्चही विमा कंपनीकडून मिळतो.
