दोन माजी सभापतींमध्ये जुंपली

By Admin | Updated: January 13, 2015 00:10 IST2015-01-12T23:35:04+5:302015-01-13T00:10:39+5:30

चिपळूण पंचायत समिती : सत्ताधाऱ्यांमधील वाद मासिक सभेत उघड

Two of the former Chairman were jampled | दोन माजी सभापतींमध्ये जुंपली

दोन माजी सभापतींमध्ये जुंपली

चिपळूण : उक्ताड मराठी शाळेसाठी मंजूर झालेले काम झाले नाही म्हणून ते बदलून घेण्यावरुन आज सोमवारी पंचायत समितीच्या मासिक सभेत माजी सभापती सुरेश खापले व माजी सभापती जितेंद्र चव्हाण यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. दोघेही सत्ताधारी पक्षाचे सदस्य आहेत. या मासिक सभेत २०१२ मध्ये तेराव्या वित्त आयोगातून सभापती असताना सुरेश खापले यांनी उक्ताड मराठी शाळेच्या छपरासाठी मंजूर केलेले दीड लाख रुपये काम न झाल्याने ते आज बदलून घेण्याचा प्रयत्न केला. या विषयावर चर्चा सुरु झाली. जुन्या झालेल्या कामाला निधी नसल्याने नवीन कामे सुचवायची नाहीत, असा ठराव झाला आहे. परंतु, जुने मंजूर असणारे काम झाले नाही ते बदलून मिळावे म्हणून माजी सभापती खापले यांनी विषय मांडला. याला माजी सभापती चव्हाण यांनी जोरदार हरकत घेतली. २०१२ चे काम २०१५ मध्ये बदलण्याबाबत चर्चा सुरु झाल्याने माजी सभापती चव्हाण आक्रमक झाले. ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव आले नाहीत म्हणून काही कामे झाली नाहीत, हे खापले यांचे म्हणणे चव्हाण यांनी मान्य केले. परंतु, उक्ताड कोणत्या मतदारसंघात येते, येथील सदस्य कोण, असे प्रश्न करताच सभापतींसह इतर सदस्यही आवक झाले. यावरुन शब्दाला शब्द वाढत गेला. सभाध्यक्ष सभापती समीक्षा बागवे यांना याबाबत आकलन न झाल्याने त्या गप्प बसून होत्या. अखेर हा निधी त्याच शाळेवर इतर कामाला खर्ची घालावा, अशी भूमिका माजी सभापती चव्हाण यांनी घेतली. त्यामुळे सभागृहात हा चर्चेचा विषय झाला होता. शिवसेनेचे सदस्य दिलीप मोरे यांनी चव्हाण यांना साथ दिली. कृषी विभागामार्फत वाटण्यात येणाऱ्या अवजारांबाबत पंचायत समिती सदस्यांना विश्वासात घ्यावे, अशी पुन्हा एकदा मागणी जोर धरु लागली. मागच्या सभेत पॉवर टीलर वाटपावरुन गदारोळ झाला होता. ज्या भागातील शेतकऱ्याला शेती अवजारांचा लाभ देण्यात येणार असेल त्या भागातील सदस्याची शिफारस घ्यावी, असे त्यावेळी ठरले होते. तरीही कृषी विभागाने पाण्याचे पंप, पॉवर टीलर वाटप करताना सदस्यांना विश्वासात न घेतल्याने माजी सभापती चव्हाण यांनी नाराजी प्रकट केली.
घाटावरुन कोकणात मोठ्या प्रमाणात मेंढपाळ शेळ्या, मेंढ्या घेऊन येतात. त्यामुळे रोगराई पसरते व स्थानिक जनावरांना त्याची बाधा होते. या मेंढपाळांनी आपल्या शेळ्या मेंढ्यांचे लसीकरण करुन घेणे सक्तीचे आहे. तशा प्रकारचे पत्र पोलीस ठाणे व ग्रामपंचायतीला द्यावे, असे माजी उपसभापती संतोष चव्हाण यांनी सूचविले. त्याला सभागृहाने मान्यता दिली. पेढांबे दाभाडी शाळेत शिक्षक कमी असल्याचा मुद्दा पूनम शिंदे यांनी मांडला. तेथील शिक्षकाची बदली झाल्यानंतर नवीन शिक्षकाची नियुक्ती झाली नसल्याचे गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले. सर्व विषयांचा आढावा घेतल्यानंतर उपसभापती सुचिता सुवार यांनी आभार मानले. यावेळी गटविकास अधिकारी गणेश पिंपळे व इतर अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Two of the former Chairman were jampled