सीएनजी भरून परतताना खारेपाटणच्या तरुणाचा जागीच अंत; वळणावर रिक्षा उलटली

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 27, 2026 15:53 IST2026-04-27T15:52:08+5:302026-04-27T15:53:03+5:30

नडगिवेचे जीवघेणे वळण अन् काळाचा घाला

Kharepatan youth dies on the spot while returning after filling CNG rickshaw overturns on a bend | सीएनजी भरून परतताना खारेपाटणच्या तरुणाचा जागीच अंत; वळणावर रिक्षा उलटली

सीएनजी भरून परतताना खारेपाटणच्या तरुणाचा जागीच अंत; वळणावर रिक्षा उलटली

खारेपाटण : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नडगिवे येथील सिद्धिविनायक हॉटेलसमोरील ते अवघड वळण पुन्हा एकदा रक्तलांछित ठरले आहे. सीएनजी गॅस भरून तळेरे येथून खारेपाटणकडे परतणाऱ्या संदीप दिलीप पाटील (४२, रा. खारेपाटण रामेश्वरनगर) यांची रिक्षा रविवारी रात्री १२:००च्या सुमारास पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने खारेपाटण परिसरावर शोककळा पसरली आहे.

संदीप पाटील हे स्वतःची रिक्षा (एमएच ०७ एएच ५२८४) चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. रविवारी रात्री ११:००च्या सुमारास ते तळेरे येथील पंपावर सीएनजी गॅस भरण्यासाठी गेले होते. गॅस भरून परतत असताना, नडगिवे येथील अवघड वळणावर त्यांचा रिक्षावरील ताबा सुटला आणि रिक्षा भीषणपणे पलटी झाली. या अपघातात संदीप यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्राव झाला. माजी सरपंच रमाकांत राऊत आणि पं. स. सदस्य गुरुप्रसाद शिंदे यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
चौकट

वळण की मृत्यूचा सापळा?

नडगिवे येथील हे वळण तांत्रिकदृष्ट्या अत्यंत धोकादायक मानले जाते. रात्रीच्या वेळी महामार्गावर प्रकाशाची पुरेशी व्यवस्था नसल्याने आणि वळणाचा नेमका अंश (Degree) लक्षात न आल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडतो. संदीप यांच्या बाबतीतही रात्रीच्या अंधारात वळणावर वेग मर्यादेचा किंवा वळण घेण्याच्या अंतराचा अंदाज चुकला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. महामार्गावरील असे 'ब्लॅक स्पॉट' आता सर्वसामान्यांसाठी मृत्यूचा सापळा बनत आहेत.

कष्टकरी कुटुंबाचा डोलारा कोसळला

संदीप पाटील हे अत्यंत कष्टाळू व्यक्तिमत्व होते. रिक्षा चालवण्यासोबतच त्यांनी काही महिन्यापूर्वी रिक्षा दुरुस्तीचा छोटा गॅरेज व्यवसाय सुरू केला होता. त्यांची पत्नी समृद्धी पाटील या खारेपाटण आरोग्य केंद्रात 'आशा स्वयंसेविका' म्हणून कार्यरत आहेत. पती - पत्नी कष्ट करून मुलांचे भविष्य घडवत असतानाच काळाने घाला घातला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. कणकवली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, अधिक तपास सुरू आहे.

Web Title : सीएनजी भरवाने के बाद खारेपाटण के युवक की दुर्घटना में मौत

Web Summary : सीएनजी भरवाकर लौट रहे संदीप पाटिल की नाडगिवे के पास ऑटो रिक्शा पलटने से मौत हो गई। खतरनाक मोड़ और रोशनी की कमी के कारण दुर्घटना हुई, उनके पीछे पत्नी और दो बच्चे हैं।

Web Title : Kharepatan Youth Dies in Auto Rickshaw Accident After CNG Refill

Web Summary : Sandeep Patil died near Nadgive after his auto rickshaw overturned. He was returning from a CNG refill. A dangerous turn and lack of lighting contributed to the accident, leaving behind his wife and two children.