आयएनएस गुलदार अखेर निवतीच्या समुद्रात, युद्धनौका ४५ टक्के पाण्यात बुडाल्यानंतर काळोखामुळे काम थांबविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 12:46 IST2026-05-19T12:46:05+5:302026-05-19T12:46:38+5:30
सातत्याने आले अडथळे

आयएनएस गुलदार अखेर निवतीच्या समुद्रात, युद्धनौका ४५ टक्के पाण्यात बुडाल्यानंतर काळोखामुळे काम थांबविले
मालवण : भारतीय नौदलातील सेवामुक्त एक्स - आयएनएस गुलदार या युद्धनौकेचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून मालवण - वेंगुर्ला जवळील निवती रॉक्स परिसरात कृत्रिम समुद्री प्रवाळ बेट व पाण्याखालील संग्रहालयात रूपांतर केले जात आहे. या ऐतिहासिक पर्यटन प्रकल्पाला सोमवार, (दि. १८ मे) रोजी सकाळपासून सुरुवात झाली. अनेक अडथळे पार करून एक्स - आयएनएस गुलदार निवतीच्या समुद्रात ४५ टक्के बुडाल्यानंतर काळोखामुळे काम थांबविण्यात आले. आज - मंगळवारी सकाळी ही प्रकिया पूर्ण होईल.
एक्स - आयएनएस गुलदार ही युद्धनौका विजयदुर्ग येथील जेटीवर ठेवण्यात आली होती. तेथून रविवारी सायंकाळी दोन टग बोटींच्या साहाय्याने ओढत निवती येथील प्रकल्पाच्या नियोजित ठिकाणी आणण्याची प्रक्रिया सुरू झाली. इंजिन व स्टेअरिंग नसलेल्या या युद्धनौकेला अत्यंत सुरक्षितपणे व सावधरीत्या सोमवारी सकाळी ९.३० पर्यंत निवती रॉक्स या ठिकाणी आणण्यात आले.
स्थिर करताना मोठी कसरत
सोमवारी सकाळी नियोजित प्रकल्पाच्या ठिकाणी एक्स आयएनएस गुलदार ही युद्धनौका आणल्यानंतर ती पूर्व-पश्चिम अशी अँकरिंग करण्यात आली. सोमवारी सकाळपासूनच समुद्रात वाऱ्याचा वेग अधिक होता, यामुळे बोट स्थिर करताना मोठी कसरत करावी लागली.
सातत्याने आले अडथळे
दुपारी एक वाजल्यापासून गुलदार युद्धनौकेत दोन मोठ्या पंपांच्या सहाय्याने आतील भागात पाणी भरण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी सोबत असलेल्या दोन टग बोटींचा या युद्धनौकेला आधार देण्यात आला होता. दुपारी चार वाजेपर्यंत युद्धनौकेत २५ ते ३० टक्के पाणी भरण्याचे काम पूर्ण झाले. पाणी भरण्याची प्रक्रिया चालू असताना सातत्याने अडथळे आले. मोठाले पंप सतत सुरू राहिल्याने ते गरम होत होते. यामुळे काही वेळाच्या अंतराने हे पंप बंद करावे लागत होते. पंप गरम होऊन बंद पडू नये यासाठी तंत्रज्ञ काळजी घेताना दिसले. या कारणामुळे पाणी भरण्याच्या प्रक्रियेला विलंब होत होता. रात्री दहा वाजेपर्यंत पाणी भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली.
...अन् काळोखामुळे काम थांबविले
दरम्यान गुलदार युद्धनौकेला पुढच्या व मागच्या बाजूला असे दोन आणि मध्येच एक असे मोठाले हवेचे तीन रबरी फुगे जोडण्यात आले होते. बोटीतील पाण्याचे पातळी वाढत होती तसतशी बोट पाण्याखाली जात होती. रात्रीच्या काळोखात बॅटरी बॅकअप नसल्यामुळे गुलदारच्या स्कटलिंगचे चे काम थांबविण्यात आले. ४५ टक्के बोट पाण्याखाली गेल्यानंतर बोट तळाला विसावण्याआधी बोट नियोजित पद्धतीने स्थिर करण्यात आली.