सिक्कीमला कर्तव्य बजावताना पाटणचे जवान बाळकृष्ण निकम शहीद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 13:32 IST2026-03-13T13:31:54+5:302026-03-13T13:32:24+5:30
पुढील वर्षी होणार होते सेवानिवृत्त

सिक्कीमला कर्तव्य बजावताना पाटणचे जवान बाळकृष्ण निकम शहीद
पाटण (जि. सातारा) : भारतीय सेनेच्या १२० इंजिनिअर रेजिमेंटमध्ये आपले कर्तव्य बजावताना पिंपळोशी (ता. पाटण) येथील जवान बाळकृष्ण विलासराव निकम (४१) बुधवारी (दि. ११) दुपारी साडेबाराच्या सुमारास शहीद झाले. त्यांचे पार्थिव विमानाने पुणे येथे आणि तेथून लष्करी रुग्णवाहिकेने पिंपळोशी येथे शुक्रवारी आणले जाणार असून, पिंपळोशी येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
जवान निकम हे २००३ मध्ये सैन्य दलात भरती झाले होते. २३ वर्षे त्यांची सैन्यदलात सेवा झाली होती. पुढील वर्षी ते सेवानिवृत्त होणार होते. त्यांनी सियाचीन, लडाख या ठिकाणी देशसेवा केली. अंतिमसमयी ते सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या सीमारेषेवर होते. दोन हजार मीटरपेक्षा अधिक उंचीवर तेथे रेडिओ ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ, बहीण, भावजय, पुतणे असा परिवार आहे.