Sangli News: वारणा धरणाची गळती रोखण्याचे काम सुरु, ४१ कोटी रुपये निधी खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 14:05 IST2026-05-11T14:05:18+5:302026-05-11T14:05:50+5:30

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांची जीवनवाहिनी

Work to stop leakage of Warna Dam the lifeline of Sangli and Kolhapur districts begins funds of Rs 41 crore spent | Sangli News: वारणा धरणाची गळती रोखण्याचे काम सुरु, ४१ कोटी रुपये निधी खर्च

Sangli News: वारणा धरणाची गळती रोखण्याचे काम सुरु, ४१ कोटी रुपये निधी खर्च

विकास शहा

शिराळा : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांची जीवनवाहिनी असलेल्या वारणा (चांदोली) धरणाच्या सुरक्षिततेसाठी जलसंपदा विभागाने हाती घेतलेल्या गळती प्रतिबंधक उपाययोजनांना मोठे यश मिळताना दिसत आहे. सध्या याठिकाणी गळती प्रतिबंधक काम सुरू असून, सुमारे ५४.८५ कोटी रुपये खर्चाच्या या विशेष प्रकल्पांतर्गत आतापर्यंत ७४% काम पूर्ण झाले असून, यामुळे धरणातून होणाऱ्या गळतीमध्ये लक्षणीय घट नोंदवली आहे.

सन २०१४ च्या अहवालानुसार, धरण पूर्ण भरलेले असताना, दगडी बांधकामातून होणारी गळती प्रति सेकंद १४३९.४८ लिटर इतकी प्रचंड होती. मात्र, शासनाने ''विशेष बाब'' म्हणून राबवलेल्या उपाययोजनांमुळे सन २०२५-२६ च्या हंगामात हे प्रमाण ५६३.२० लिटर प्रति सेकंद इतके खाली आले आहे. विशेषतः डाव्या बाजूच्या गळतीत मोठी सुधारणा झाली आहे.

पुणे येथील ''सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन'' च्या वैज्ञानिकांनी केलेल्या ''न्यूक्लियर डेंसिटी लॉगिंग'' आणि ''सिस्मिक टोमोग्राफी'' अभ्यासानंतर या कामाचा आराखडा तयार केला होता. याअंतर्गत खालील महत्त्वाची कामे पूर्ण केली आहेत :

धरण माथा ते गॅलरीपर्यंत प्रायमरी आणि सेकंडरी ड्रिलिंग आणि ग्राउटिंगचे काम पूर्ण झाले आहे. धरणाच्या उर्ध्व बाजूकडील काँक्रीट भिंतीला मजबुती देण्यासाठी १०० मि.मी. जाडीचे शॉटक्रिटिंग करता आलेले नाही. गळतीचे पाणी वाहून नेणाऱ्या ''व्हर्टिकल पोरस ड्रेन''ची स्वच्छता पूर्ण करण्यात आली आहे. धरण सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले फाउंडेशन बेस (पाया)पर्यंतचे ड्रिलिंग आणि ग्राउटिंगचे काम अद्याप बाकी आहे. हे काम करण्यासाठी धरणाची पाणी पातळी मृत साठा पातळीपर्यंत ( ५८८.२० मी.) खाली येणे आवश्यक आहे.

गेल्या तीन वर्षांत समाधानकारक पाऊस आणि पाणीसाठ्यामुळे ही पातळी खाली गेली नव्हती. त्यामुळे आगामी २०२५-२६ च्या हंगामात उजव्या बाजूचा रिव्हर स्लुइस (नदी विसर्ग मोरी) सुरू करून पाणी पातळी कमी करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.

दृष्टीक्षेपात प्रकल्प

  • एकूण प्रशासकीय मान्यता : ५४.८५ कोटी रुपये.
  • आतापर्यंत झालेला खर्च : ४०.७८ कोटी रुपये.
  • काम पूर्णतेची अंतिम मुदत : जून २०२७.
  • धरणाची क्षमता : ३४.४० टीएमसी (जिवंत साठा २७.५२ टीएमसी).

"वारणा धरणाचे आयुष्य वाढवण्यासाठी आणि सिंचनाचे पाणी वाचवण्यासाठी ही कामे अत्यंत महत्त्वाची आहेत. सध्या हे काम सुरू आहे. उर्वरित २६% कामे जून २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे आमचे नियोजन असून, यामुळे धरण पूर्णपणे सुरक्षित होईल."  - एन. टी. पोतदार, कार्यकारी अभियंता.

Web Title : सांगली: वारणा बांध के रिसाव को रोकने का काम जारी

Web Summary : वारणा बांध के रिसाव नियंत्रण परियोजना में प्रगति, 74% पूर्ण और रिसाव में महत्वपूर्ण कमी। काम में ड्रिलिंग, ग्राउटिंग और जल निकासी की सफाई शामिल है। परियोजना का लक्ष्य बांध को सुरक्षित करना और सिंचाई के पानी को बचाना है, जो जून 2027 तक पूरा हो जाएगा।

Web Title : Sangli: Work on Stopping Leakage of Warna Dam Underway

Web Summary : Warna Dam's leakage control project progresses, with 74% completion and significant leakage reduction. Work includes drilling, grouting, and drainage cleaning. Project aims to secure the dam and save irrigation water, with completion by June 2027.