Sangli News: वायफळेतील जवान विशाल घोडके कानपूरमध्ये देशसेवेत असताना शहीद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 18:42 IST2026-05-18T18:39:02+5:302026-05-18T18:42:18+5:30
कानपूर येथे देशसेवेत असताना आकस्मिक मृत्यू : गावावर शोककळा

Sangli News: वायफळेतील जवान विशाल घोडके कानपूरमध्ये देशसेवेत असताना शहीद
तासगाव : वायफळे (ता. तासगाव) येथील जवान विशाल सदाशिव घोडके (वय ३२) यांचे देशसेवेत असताना शनिवारी आकस्मिक निधन झाले. कानपूर येथे सैन्य दलात सेवा बजावत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेमुळे वायफळेसह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली असून, घोडके कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोमवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
विशाल घोडके हे लहानपणापासूनच देशसेवेच्या भावनेने प्रेरित होते. आपल्या मातृभूमीसाठी काहीतरी मोठे करावे, सैन्य दलात भरती होऊन देशाचे रक्षण करावे, हे त्यांचे स्वप्न होते. घोडके कुटुंबीयांमध्येच देशसेवेची परंपरा असल्यामुळे त्यांच्यावरही त्याचा मोठा प्रभाव पडला होता. त्यांचे वडील सदाशिव घोडके यांनी अनेक वर्षे सैन्य दलात सेवा बजावत देशसेवा केली होती, तसेच त्यांचे मोठे बंधू विनोद घोडके हेही गेल्या अनेक वर्षांपासून सैन्य दलात कार्यरत आहेत. त्यामुळे देशसेवेचे बाळकडू विशाल यांना घरातूनच मिळाले होते.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच विशाल यांनी सैन्य दलात भरती होण्याचे ध्येय निश्चित केले होते. त्यासाठी त्यांनी कठोर मेहनत घेतली. अभ्यासाबरोबरच मैदानावर तासन्स घाम गाळत त्यांनी शारीरिक तयारी केली. दिवस-रात्र अथक परिश्रम घेत अखेर वयाच्या अवघ्या १८-१९ व्या वर्षी त्यांची सैन्य दलात निवड झाली. त्यानंतर तब्बल १३ ते १४ वर्षे त्यांनी देशसेवेत स्वतःला झोकून दिले. सध्या ते कानपूर येथे सैन्य दलाच्या युनिटमध्ये कार्यरत होते. मात्र, शनिवारी सकाळी काळाने अचानक घाला घातला.
देशसेवेचे कर्तव्य बजावत असतानाच त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला. ही बातमी गावात समजताच वायफळे परिसरात शोककळा पसरली. गावातील अनेकांनी घोडके कुटुंबीयांच्या घरी धाव घेत त्यांचे सांत्वन केले. विशाल यांच्या निधनामुळे गावाने एक कर्तव्यदक्ष जवान गमावला असल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. विशाल घोडके यांचे पार्थिव सोमवारी सकाळी वायफळे येथे आणण्यात येणार असून, त्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.