खोकीधारकांवर टांगती तलवार कायम
By Admin | Updated: January 29, 2015 00:07 IST2015-01-28T23:00:27+5:302015-01-29T00:07:08+5:30
आष्ट्यातील अतिक्रमणे : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर तात्पुरता दिलासा

खोकीधारकांवर टांगती तलवार कायम
आष्टा : आष्टा बसस्थानकासमोरील खोकीधारकांची अतिक्रमणे काढण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी तीन महिन्यांसाठी नुकतीच स्थगिती दिली आहे, मात्र लवकरच ही अतिक्रमणे काढावी लागणार असल्याने या खोकीधारकांमध्ये ‘थोडी खुशी गम जादा’ अशी भावना आहे.पेठ-सांगली रस्त्यावर आष्ट्यानजीक सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने रस्ता रुंदीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. आष्टा बसस्थानकासमोरील सांगली, आष्टा, इस्लामपूर रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुमारे ३५ ते ४0 वर्षापासून अनेक बेरोजगार युवकांनी लोखंडी खोकी टाकून स्वत:चे व्यवसाय सुरु केले. कोणी गॅरेज, सायकल दुकान, आॅटो पार्टस्, वेल्डींग, केशकर्तनालय, तर कोणी पानपट्टी, बेकरी, जनरल स्टोअर्स, रसवंतीगृह, नाष्टा सेंटर, हॉटेल सुरु केले. त्यांनी अनेक बँका, पतसंस्थांची यासाठी कर्जे काढली.
सहा महिन्यांपूर्वी माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, माजी आमदार विलासराव शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व खोकीधारक यांच्यात बैठक होऊन रस्त्याच्या माध्यमापासून १५ मीटरऐवजी ११ मीटरचा रस्ता, १ मीटर गटार, फुटपाथ सोडून दुकान गाळे खोकी ठेवण्यास मान्यता देण्यात आली. त्याप्रमाणे खोकीधारकांनी खोकी मागे सरकवून घेतली. मात्र लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर सरकार बदलले, जिल्हाधिकारी यांना आदेश मिळाल्याने जिल्ह्यातील सर्व अतिक्रमणे काढण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आष्टा शहरातील सार्वजनिक बांधकामच्या जागेतील खोकीधारकांचीही अतिक्रमणे काढण्याचे आदेश मिळाल्याने दि. १८ ते २१ पर्यंतची मुदत देऊन ती खोकी काढण्याची नोटीस सर्व १२७ खोकीधारकांना देण्यात आली. आमदार जयंत पाटील, विलासराव शिंदे, नगराध्यक्षा मंगला शिंदे यांनी बैठक घेतली.
या नोटिसीनंतर खोकीधारकांमध्ये खळबळ माजली. लाखो रुपये कर्ज काढून उभारलेली दुकाने जाणार, या भीतीने ते हवालदिल झाले. तीन दिवस दुकाने बंद ठेवून त्यांनी या घटनेचा निषेध केला. जिल्हाधिकाऱ्यांना पुनर्वसन करण्याची मागणी करीत निवेदन दिले. माजी आमदार विलासराव शिंदे, मुख्याधिकारी अभिजित राऊत, वाळवा पंचायत समितीचे उपसभापती वैभव शिंदे, विशाल शिंदे, नगराध्यक्षा मंगलादेवी शिंदे, सुनील माने, शैलेश सावंत यांच्यासह खोकीधारकांची जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्याशी बैठक झाली. त्यांनी पर्यायी जागांबाबत चर्चा केली. खोकीधारकांना तीन महिन्याची मुदत दिली. आष्टा बसस्थानक परिसरातील एसटी महामंडळाची जागा, तसेच जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील जागेबाबतही विचार झाला. या जागांबाबत खोकीधारक सकारात्मक असले तरी लवकर निंर्णय होणे आवश्यक आहे.
या खोक्यांबरोबर शासनाच्या जागेवरील अन्य अतिक्रमणांवरही हातोडा पडणार असल्याने नागरिकही संभ्रमावस्थेत आहेत. आमदार जयंत पाटील, विलासराव शिंदे यांनी न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. तीन महिन्यांची मुदत असली तरी, तीन महिन्यानंतर काय? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. (वार्ताहर)