मंत्री असताना सांगली-पेठ रस्ता केला नाही, त्यांनी ‘शक्तिपीठ’वर बोलू नये; चंद्रकांत पाटील यांचा जयंत पाटील यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 18:27 IST2026-05-14T18:26:13+5:302026-05-14T18:27:05+5:30

शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, असा निर्णय शासन घेणार

Sangli-Peth road was not built when he was a minister, he should not speak on Shaktipeeth, Chandrakant Patil's attack on Jayant Patil | मंत्री असताना सांगली-पेठ रस्ता केला नाही, त्यांनी ‘शक्तिपीठ’वर बोलू नये; चंद्रकांत पाटील यांचा जयंत पाटील यांना टोला

मंत्री असताना सांगली-पेठ रस्ता केला नाही, त्यांनी ‘शक्तिपीठ’वर बोलू नये; चंद्रकांत पाटील यांचा जयंत पाटील यांना टोला

सांगली : जिल्ह्यातील काही नेते वर्षानुवर्षे मंत्री राहिले, मात्र त्यांना सांगली ते पेठ रस्ता करता आला नाही. ते आता शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत आहेत. ज्यांना साधा रस्ता करता आला नाही, त्यांनी शक्तिपीठवर बोलू नये, असा टोला जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाव न घेता आमदार जयंत पाटील यांना लगावला. शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, असा निर्णय शासन घेणार असून, भरपाईची रक्कम चांगली दिली जाईल, असेही पाटील म्हणाले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या सभेनंतर बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाबाबत एक ते दोन दिवसांत कोणत्या गावातून रस्ता जाणार आणि किती शेतकऱ्यांची जमीन संपादित होणार याचे चित्र स्पष्ट होईल. सरकार शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी भूमिका घेणार आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशात धरणे, विमानतळे, महामार्ग उभे राहिले. त्यासाठी लोकांनी जमिनी दिल्या, तेव्हाच विकास शक्य झाला. दिवंगत तत्कालीन केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण आणि विलासराव देशमुख यांच्या काळातही विकास प्रकल्पांसाठी जमिनी द्याव्या लागल्या. समृद्धी महामार्ग असो वा पुरंदर विमानतळ, प्रकल्प उभे राहताना सुरुवातीला विरोध झाला, मात्र सरकारने मार्ग काढला, असेही त्यांनी नमूद केले.

शक्तिपीठ महामार्ग कोणत्या गावांतून जाणार, किती जमीन लागणार याची स्पष्ट माहिती लवकरच जाहीर होईल. ज्या ठिकाणी अडचणी निर्माण होतील, त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. ‘देशात धरणे आणि विमानतळे आकाशात बांधली का?’ असा सवाल करत विकासासाठी काही गोष्टींचा त्याग करावा लागतो, असेही त्यांनी सांगितले.

घोड्यावर नव्हे, उंटावर बसायला हवे होते!

इंधन बचतीच्या मुद्द्यावर बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांनाही मिश्कील टोला लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन केले आहे. त्यानुसार जितेंद्र आव्हाड यांनी घोड्यावर नव्हे, उंटावर बसायला हवे होते, असे म्हणत त्यांनी हास्याची लकेर उमटवली. पुढे ते म्हणाले, माझ्यासह राज्यातील दहा मंत्र्यांना केंद्र सरकारची सुरक्षा असल्यामुळे मी त्यात काहीही बदल करू शकत नाही. मी राज्यभर फिरतो म्हणून टीका होते, मात्र अनावश्यक प्रवास टाळला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title : सांगली-पेठ सड़क पर चंद्रकांत पाटिल ने जयंत पाटिल पर साधा निशाना

Web Summary : चंद्रकांत पाटिल ने जयंत पाटिल की सांगली-पेठ सड़क बनाने में विफलता पर आलोचना की और शक्तिपीठ राजमार्ग के विरोध पर सवाल उठाया। उन्होंने किसानों को भूमि अधिग्रहण के लिए उचित मुआवजा सुनिश्चित किया और विकास के लिए बलिदान की आवश्यकता पर बल दिया।

Web Title : Chandrakant Patil Criticizes Jayant Patil Over Sangli-Peth Road Inaction.

Web Summary : Chandrakant Patil criticized Jayant Patil for failing to build the Sangli-Peth road while a minister, questioning his opposition to the Shaktipeeth highway. He assured fair compensation for farmers' land acquisition, emphasizing development requires sacrifice, citing past projects facing initial resistance.