नादखुळा!, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 'घरीच' तयार केले 'इतके' हजार क्विंटल बियाणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 17:13 IST2026-05-15T17:12:40+5:302026-05-15T17:13:03+5:30
बाजारातील बियाण्यांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कृषी विभागाने घेतला निर्णय

संग्रहीत छाया
सांगली : यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात तब्बल ३७, ८४८ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पेरणीसाठी ३७ हजार क्विंटल बियाण्याची गरज भासणार आहे. यापैकी ग्राम बीजोत्पादनातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घरीच २९ हजार क्विंटल बियाणे तयार केले आहे. बाजारातील बियाण्यांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कृषी विभागाने हा निर्णय घेतला आहे.
गतवर्षी राबविण्यात आलेल्या ग्रामबीजोत्पादन अभियानात जिल्ह्यातील ३ हजार ५६७ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. त्यातून तब्बल २९,३७७ क्विंटल घरचे सोयाबीन बियाणे तयार झाले आहे. कृषी विभागाने २ हजार ३१२ शेतकऱ्यांच्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासली असता, १ हजार ८५९ शेतकऱ्यांच्या बियाण्यांची उगवणक्षमता ७० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सुमारे ४,५५७ क्विंटल दर्जेदार बियाणे उपलब्ध होणार असून, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
वाळवा, पलूस आणि मिरज तालुक्यातील शेतकरी लवकर पेरणी करतात. त्यामुळे वेळेत बियाणे उपलब्ध व्हावे, यासाठी कृषी विभागाने नियोजनबद्ध हालचाली सुरू केल्या आहेत. घरच्या बियाण्यांच्या वापरामुळे खर्चात बचत होण्याबरोबरच दर्जेदार उत्पादन मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
तालुकानिहाय सोयाबीन पेरणी क्षेत्र
तालुका / क्षेत्र हेक्टरमध्ये
वाळवा — ९,०००
मिरज — ६,६००
तासगाव — ५,२२०
शिराळा — ४,४७८
कडेगाव — ४,२००
कवठेमहांकाळ — ३,२००
पलूस — ३,२००
विटा — १,९५०
ग्रामबीजोत्पादनात वाळवा आघाडीवर
ग्रामबीजोत्पादन मोहिमेत वाळवा तालुक्यातील १ हजार २०० शेतकऱ्यांनी सहभाग घेत सर्वाधिक ७,५८० क्विंटल बियाणे उत्पादनाचे उद्दिष्ट गाठले आहे. मिरज तालुक्यात ५,७९७ क्विंटल, तर शिराळ्यात ४,१०० क्विंटल बियाणे उत्पादन झाले आहे.
तालुकानिहाय शेतकऱ्यांकडील बियाणे
तालुका / शेतकरी संख्या / बियाणे (क्विंटल)
शिराळा ६४५ / ४,१००
वाळवा १,२०० / ७,५८०
तासगाव ३४८ / २,७०५.३
खानापूर ३१२ / १,८७२
कवठेमहांकाळ १५ / ९००
मिरज ३३४ / ५,७९७.५
पलूस २५० / ३,६२६
कडेगाव ४६३ /२,६९६.७
एकूण ३,५६७ / २९,३७७.३
“खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेत आणि दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावे, यासाठी कृषी विभागाने तयारी केली आहे. ग्रामबीजोत्पादन मोहिमेमुळे बाजारातील बियाण्यांवरील अवलंबित्व कमी होत असून, शेतकऱ्यांचीही खर्चात बचत होत आहे. घरच्या बियाण्यांची उगवणक्षमता तपासूनच त्यांचा वापर करण्याची गरज आहे.” - विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली