चिंताजनक बातमी! महाराष्ट्रात सप्टेंबरच्या अतिवृष्टीचा तडाखा तब्बल ८३ लाख शेतकऱ्यांना बसला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 12:58 IST2025-10-18T12:58:15+5:302025-10-18T12:58:56+5:30
शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून ७ हजार ९८ कोटी रुपयांच्या निधीची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.

चिंताजनक बातमी! महाराष्ट्रात सप्टेंबरच्या अतिवृष्टीचा तडाखा तब्बल ८३ लाख शेतकऱ्यांना बसला
पुणे : राज्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे एकूण ६८ लाख १३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात सुमारे ७ लाख हेक्टर क्षेत्र शासन निर्णयानुसार विशेष बाब म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. या आपत्तीमुळे तब्बल ८३ लाख शेतकऱ्यांना तडाखा बसला आहे. तर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून ७ हजार ९८ कोटी रुपयांच्या निधीची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.
राज्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीचे नुकसान मोजण्यासाठी तब्बल १७ दिवसांचा कालावधी लागला आहे. महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार ३४ जिल्ह्यांपैकी वर्धा, यवतमाळ, अमरावती, अहिल्यानगर, धुळे व नाशिक या सहा जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारने जाहीर केलेल्या निकषांपूर्वीच पंचनामे पूर्ण करण्यात आले होते. त्यामुळे या सहा जिल्ह्यांमध्ये नव्याने पंचनामे पूर्ण करताना विशेष बाब म्हणून दोन हेक्टरची मर्यादा तीन हेक्टरवर करण्यात आली. त्यानुसार सुमारे ७ लाख २ हजार १९ हेक्टरचे क्षेत्र वाढले आहे.
राज्यात गुरुवार अखेर ६१ लाख ११ हजार २२३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची झाल्याचे सांगण्यात आले होते. आता त्यात या ७ लाख २ हजार १९ हेक्टरचे क्षेत्र अंतर्भूत करण्यात आल्यानंतर एकूण नुकसानीचे क्षेत्र ६८ लाख १३ हजार २४२ हेक्टर इतके झाले आहे. या नुकसानीमुळे राज्यातील ८३ लाख १२ हजार ९७० शेतकऱ्यांना तडाखा बसला आहे. या पंचनाम्यांनुसार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी राज्य सरकारकडे ७ हजार ९८ कोटी ६८ लाख २१ हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे. आता राज्याचा मदत व पुनर्वसन विभाग यासंदर्भात शासन निर्णय जारी करून शेतकऱ्यांना मदत थेट खात्यावर जमा करणार आहे.
एकूण बाधित क्षेत्र : ६८१३२४२
एकूण बाधित जिल्हे : ३४
एकूण बाधित शेतकरी : ८३१२९७०
नुकसानभरपाई : ७०९८ कोटी ६८ लाख २१ हजार