विद्यार्थ्यांच्या ताटात अळी, तरीही प्रशासन म्हणत ‘शाेध’ घ्या! वारंवार तक्रारी करूनही कारवाई नाही, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 11:46 IST2026-05-18T11:46:11+5:302026-05-18T11:46:28+5:30

वारंवार पाठपुरावा करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या आराेग्याचे काहीच पडले नाही

Worms on students' plates, yet administration says 'investigate'! Repeated complaints but no action, this is what happens at Savitribai Phule Pune University | विद्यार्थ्यांच्या ताटात अळी, तरीही प्रशासन म्हणत ‘शाेध’ घ्या! वारंवार तक्रारी करूनही कारवाई नाही, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रकार

विद्यार्थ्यांच्या ताटात अळी, तरीही प्रशासन म्हणत ‘शाेध’ घ्या! वारंवार तक्रारी करूनही कारवाई नाही, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रकार

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृह क्रमांक आठच्या भाेजनगृहामध्ये जेवणात अळी सापडल्याचा प्रकार समाेर आला आहे. ही घटना रविवारी (दि. १७) घडली असून, विद्यापीठ प्रशासनाची उदासीनता विद्यार्थ्यांचे आराेग्य धाेक्यात आणणारी आहे. वारंवार पाठपुरावा करून प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या आराेग्याचे काहीच पडले नाही. त्यामुळे असे प्रकार पुन्हा पुन्हा घडत आहेत, असा आराेप विद्यार्थी प्रतिनिधींनी केला आहे.

यासंदर्भात भाेजन समिती प्रमुखांकडे चाैकशी केली असता घडल्या प्रकाराला दुजाेरा दिला आहे. असे असतानाही प्रभारी कुलसचिव महाेदयांनी मात्र मेसमध्ये अळी कधी निघते? याचा अभ्यास करण्याचा सल्ला देत आहेत. ही बाब संतापजनक, तसेच प्रशासनाच्या असंवेदनशीलतेचे दर्शन घडवणारी आहे.

सध्या विविध विषयांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थी दिवस-रात्र अभ्यासात गुंतले असून, जेवणाची वेळ झाली की त्यांची पावले भाेजनगृहाकडे वळत असतात. रविवारी रात्री विद्यार्थी मेसमध्ये गेले आणि जेवणाचा ताट घेऊन ग्रुपने जेवण करत असताना शेवग्याच्या भाजीत अळी आढळली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाकडे तक्रार केली असता भाेजन समिती प्रमुखांनी मेसचालकाशी संपर्क साधून भाजी बदलून देण्यास सांगितले.

या भाेजनालयात निकृष्ट, अस्वच्छ आणि अपुरे अन्न दिले जात असल्याने विद्यार्थी तीव्र संताप व्यक्त करत आहेत. विद्यार्थ्यांच्या मते जी-८ मेस आणि रिफेक्टरीचे टेंडर एकाच कंत्राटदाराकडे आहे. या मेस चालकाकडून हाेणाऱ्या हलगर्जीपणाबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत तरीही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नाही. टेंडरमधील निकषांचे उल्लंघन हाेत असून, चपाती मिळण्याकरिता तासन् तास रांगेत उभे राहावे लागणे, हे प्रकार नियमित सुरू आहेत. चालू महिन्यातील ही चौथी गंभीर घटना आहे.

याबाबत वसतिगृह व भाेजन समिती प्रमुख प्रा. राजेंद्र घाेडे यांना विचारले असता शेवगाच्या भाजीत अळी सापडल्याची माहिती विद्यार्थ्यांनी फाेनवरून दिली हाेती. त्याची दखल घेत मेस चालकाला फाेन करून भाजी बदलून देण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे पुढील आठवड्यात नवीन टेंडर निघणार असून, त्यात याेग्य ठेकेदाराची निवड केली जाईल, असे सांगितले.

प्रशासन इतके मेहरबान का?

भोजनगृह समितीच्या दि. ४ मे २०२६ रोजी झालेल्या बैठकीत विद्यार्थी सदस्यांनी जी-८ मेससह विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतरही कारवाई हाेत नसल्याने मेस चालकांवर काही अधिकारी मेहेरबान असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वारंवार तक्रारी होऊनही संबंधितांवर दंडात्मक कारवाई किंवा नोटीस दिली जात नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आम्ही विद्यार्थी रविवारी रात्री जी-८ मेसमध्ये जेवत हाेताे. यावेळी शेवगाच्या भाजीत अळी आढळून आली. अवघ्या महिनाभरात ५ ते ६ वेळा असे प्रकार घडले आहेत. याची गंभीर दखल घेऊन विद्यापीठ प्रशासनाने संबंधित मेसचालकावर तत्काळ कठोर कारवाई करावी. - अभिषेक शेलकर, अध्यक्ष, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती.

मेसमध्ये जेवताना रविवारी रात्री भाजीमध्ये अळी आढळली आहे. ठेकेदार दर्जाहीन अन्न पुरवून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळत आहे. याची गंभीर दखल घेत मेस चालकावर कठोर कारवाई करावी. - निखिल बारस्कर, विद्यार्थी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
 

Web Title : पुणे विश्वविद्यालय के भोजन में कीड़ा; प्रशासन ने जांच के आदेश दिए!

Web Summary : सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालय के छात्रों को भोजन में कीड़ा मिला। खराब भोजन की गुणवत्ता के बारे में बार-बार शिकायतों के बावजूद, प्रशासन की कार्रवाई धीमी रही है, जिससे छात्र विरोध कर रहे हैं और कैटरर के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग कर रहे हैं।

Web Title : Worm found in Pune University food; admin orders investigation!

Web Summary : Students at Savitribai Phule Pune University found a worm in their food. Despite repeated complaints about poor food quality, the administration has been slow to act, prompting student protests and calls for stricter action against the caterer.