ताटात हात घालून का खातो? दारूच्या नशेत किरकोळ वाद; मित्रांनी केला मित्राचा खून, धायरीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 13:05 IST2024-10-13T13:05:44+5:302024-10-13T13:05:52+5:30

वाद झाल्यानंतर मध्यरात्री ५ मित्रांनी किरकोळ वादातून तरुणाला गाठून बांबूने मारहाण करत खून केला

Why do you eat with your hands on the plate? minor drunken altercations; Friends killed a friend, incident in Dhairi | ताटात हात घालून का खातो? दारूच्या नशेत किरकोळ वाद; मित्रांनी केला मित्राचा खून, धायरीतील घटना

ताटात हात घालून का खातो? दारूच्या नशेत किरकोळ वाद; मित्रांनी केला मित्राचा खून, धायरीतील घटना

धायरी: दारु पिल्यानंतर जेवण करताना ताटात हात घालून का खातो, या कारणावरुन झालेल्या वादातून तरुणाचा लाकडी बांबु, दगडाने मारहाण करुन खून केला. आदित्य घोरपडे (वय :२१ वर्षे, रा. घोरपडे चाळ, गारमाळ, धायरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सिंहगड रस्ता पोलिसांनी आकाश ऊर्फ नन्या परदेशी, तसेच त्याचा सावत्र भाऊ सुरेश शुक्ला व तीन मित्रांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत आदित्य याची आई राजश्री संतोष घोरपडे यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. खुनाचा प्रकार धायरी रस्त्यावरील लाडली साडी सेंटरजवळील त्रिमुर्ती किराणा दुकानासमोर आज पहाटे एक वाजण्याच्या सुमाराला घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य घोरपडे व त्याचे मित्र नर्‍हे येथील गॅलक्सी रेस्टो बार येथे दारु पित बसले होते. दारु पिल्यानंतर त्यांनी जेवण मागविले. ते जेवण करीत असताना आकाश हा आदित्य याच्या ताटात हात घालून खाऊ लागला. तेव्हा आदित्य याला ते किळसवाणे वाटले. त्याने माझ्या ताटातील घेऊन कशाला खातो, असा जाब विचारला.

दारुच्या नशेत असल्याने त्यांच्यात वाद झाला. तेव्हा आकाश निघून गेला. आदित्य व त्याचे मित्रही जेवण झाल्यावर घरी जात होते. मध्यरात्री १ वाजून १५ मिनिटांनी आकाश व त्याच्या मित्रांनी वाटेत आदित्यला गाठून त्याला लाकडी बांबु व दगडाने मारहाण केली. जबर जखमी झालेल्या आदित्यचा मृत्यु झाला.

ही घटना समजताच पोलीस उपायुक्त संभाजी कदम, अमोल झेंडे, निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार, साईनाथ ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर, गुन्हे निरीक्षक अतुल भोस यांच्यासह इतर अधिकार्‍यांनी घटनास्थळाला भेट दिली. आदित्यला मारल्यानंतर सर्व आरोपी फरार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. गुन्हे निरीक्षक अतुल भोस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Why do you eat with your hands on the plate? minor drunken altercations; Friends killed a friend, incident in Dhairi