'आम्हाला लाडकी बहीण नको; सुरक्षा योजना सुरु करा', पुण्यातील संतप्त महिलांची सरकारकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 13:37 IST2026-05-06T13:32:30+5:302026-05-06T13:37:49+5:30
आम्ही दिवसभर पोटापाण्यासाठी कामाला जातो, मुली घरी असतात, आम्हाला त्या सुरक्षित पाहिजेत

'आम्हाला लाडकी बहीण नको; सुरक्षा योजना सुरु करा', पुण्यातील संतप्त महिलांची सरकारकडे मागणी
पुणे : आम्हाला लाडकी बहीण नको, महिलांसाठी सुरक्षा योजना सुरु करा, अशी मागणी पुण्यातील महिलांनी सरकारकडे लोकमतशी बोलताना केली आहे. पर्वती येथे आजोबाकडून ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला. त्यानंतर संतप्त जमावाने रात्री याभागात रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी गृहिणी महिलांनी मुलींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
आम्हाला लाडकी बहीण नको. आमच्यासाठी आणि आमच्या मुलींसाठी सुरक्षा योजना सुरु करा. सद्यस्थितीत कोणत्याही लहान मुली सुरक्षित नसल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले आहे. आता कितीतरी प्रकरणे रोज घडत आहेत. आम्ही दिवसभर पोटापाण्यासाठी कामाला जातो. आमच्या मुली शाळेत जातात. नंतर घरी असतात. त्यामुळे आता आमच्या पोरी सुरक्षित पाहिजे अशी मागणी या पालकांनी केली आहे.
पुणे शहरातील पर्वती पायथा परिसरातील जय भवानी नगर येथे अत्यंत संतापजनक व धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच आजोबांकडून गैरकृत्य करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे.आरोपीचे नाव अंबादास यलम्मा जाधव (वय अंदाजे 62 वर्षे, रा. जय भवानी नगर) असे असून तो पीडित मुलीचा आजोबा असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या आजोबावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना घडत असताना परिसरातील नागरिकांच्या वेळीच लक्षात आल्यामुळे त्यांनी तातडीने हस्तक्षेप करत आरोपीला पकडले आणि संतप्त जमावाने त्याला चोप दिला. या प्रकारानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी निलायम पूल ते पर्वती पायथा दरम्यान रास्ता रोको आंदोलन केले. नसरापूर येथील अलीकडील घटनेमुळे आधीच संतप्त असलेले नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. दरम्यान, पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडितेची आई पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.