४२ महिन्यांचा पगार थकल्याने वॉचमनने स्वतःला संपवलं; सिंहगड कॉलेजच्या मारुती नवलेसह कुटुंबीयांविरोधात गुन्हा

By किरण शिंदे | Updated: May 14, 2026 19:27 IST2026-05-14T19:27:15+5:302026-05-14T19:27:50+5:30

वॉचमनचा मागील तब्बल ४२ महिन्यांपासून पगार मिळाला नव्हता, त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर गंभीर आर्थिक संकट ओढावले होते.

Watchman commits suicide after not getting 42 months' salary; Case filed against Sinhagad College's Maruti Navale and family | ४२ महिन्यांचा पगार थकल्याने वॉचमनने स्वतःला संपवलं; सिंहगड कॉलेजच्या मारुती नवलेसह कुटुंबीयांविरोधात गुन्हा

४२ महिन्यांचा पगार थकल्याने वॉचमनने स्वतःला संपवलं; सिंहगड कॉलेजच्या मारुती नवलेसह कुटुंबीयांविरोधात गुन्हा

पुणे : तब्बल ४२ महिन्यांपासून पगार न मिळाल्याने आर्थिक विवंचना, कर्जबाजारीपणा आणि मानसिक तणावाला कंटाळून सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये वॉचमन म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सिंहगड संस्थेचे संस्थापक मारुती नवले यांच्यासह कुटुंबातील सदस्य आणि इतर विश्वस्तांविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव समीर माधवराव दाभोळकर (वय ५३, रा. स्वराज्य हाइट्स, साई चौक, हिंगणे खुर्द, पुणे) असे आहे. मयत समीर दाभोळकर यांचा मुलगा वृषभ समीर दाभोळकर यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे संस्थापक मारुती निवृत्ती नवले, सेक्रेटरी सुनंदा मारुती नवले, उपाध्यक्ष रचना नवले उर्फ अष्टेकर, उपाध्यक्ष रोहित मारुती नवले तसेच संस्थेचे इतर विश्वस्त आणि ट्रस्टी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर दाभोळकर हे २००२ पासून सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये वॉचमन म्हणून कार्यरत होते. त्यांना मागील तब्बल ४२ महिन्यांपासून पगार मिळाला नव्हता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर गंभीर आर्थिक संकट ओढावले होते. कर्जाचा वाढता बोजा, घरातील खर्च आणि सततच्या आर्थिक अडचणींमुळे ते प्रचंड मानसिक तणावाखाली होते.

या तणावातूनच त्यांनी १३ मे रोजी सिंहगड कॉलेजच्या पन्हाळा हॉस्टेलमधील रूम क्रमांक २३ मध्ये बेडशीटच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. या घटनेनंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title : 42 महीने से वेतन नहीं मिलने पर वॉचमैन ने की आत्महत्या; मामला दर्ज

Web Summary : पुणे: सिंहगढ़ कॉलेज के एक वॉचमैन ने 42 महीने से वेतन नहीं मिलने, आर्थिक तंगी और मानसिक तनाव के कारण आत्महत्या कर ली। भारती विद्यापीठ पुलिस स्टेशन में सिंहगढ़ संस्थान के संस्थापक मारुति नवले, परिवार और ट्रस्टियों के खिलाफ मामला दर्ज किया गया है। वह अपने कमरे में लटका हुआ पाया गया।

Web Title : Unpaid for 42 Months, Watchman Ends Life; Case Filed

Web Summary : Pune: A watchman at Sinhgad College committed suicide due to 42 months of unpaid wages, financial distress, and mental stress. A case has been registered against Sinhgad Institute founder Maruti Navale, family, and trustees at Bharati Vidyapeeth Police Station. He was found hanging in his room.