दोन दुचाकीचे हँडल एकमेकात अडकले; मागून इकोची धडक, शिक्षकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 19:35 IST2025-08-04T19:35:05+5:302025-08-04T19:35:35+5:30
इको गाडीची जबरदस्त धडक बसल्याने शिक्षक हे दुसऱ्या मोटरसायकलवर पडून डांबरी रस्त्यावर कोसळले, त्याच्या हाताला व डोक्याला गंभीर जखमा होऊन मृत्यू झाला

दोन दुचाकीचे हँडल एकमेकात अडकले; मागून इकोची धडक, शिक्षकाचा मृत्यू
मंचर: दोन दुचाकी वाहने व इको गाडीच्या विचित्र अपघातात शिक्षकाचा मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे. हा अपघातमंचर घोडेगाव रस्त्यावर निघोटवाडी गावच्या हद्दीत चिंचपुरमळा येथे आज दुपारी बारा वाजता झाला. अजय मनोहर आढळराव पाटील(वय 32 रा. लांडेवाडी) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून प्रतीक कोकरे हा जखमी झाला आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षक असलेले अजय मनोहर आढळराव हे मंचर येथील बँकेतील काम करून दुचाकीवरून मंचर बाजूकडून लांडेवाडीकडे चालले होते. मंचर घोडेगाव रस्त्यावर निघोटवाडी गावच्या हद्दीत चिंचपुरमळा येथे दुचाकीच्या शेजारी दुसरी दुचाकी आली. प्रतीक कोकरे ती चालवत होता. दोन्ही दुचाकीचे हँडल जवळ आल्याने एकमेकात अडकले. त्याचवेळी समोरून घोडेगाव बाजूकडून इको गाडीची धडक दोन्ही मोटरसायकलला बसली. इको गाडीची जबरदस्त धडक बसल्याने अजय आढळराव हे दुसऱ्या मोटरसायकलवर पडून डांबरी रस्त्यावर कोसळले. त्याच्या हाताला व डोक्याला गंभीर जखमा झाल्या. तर दुसऱ्या दुचाकीवरील प्रतीक कोकरे हे सुद्धा जखमी झाले. आढळराव यांच्या दुचाकीचा चक्काचूर होऊन मागील चाक सुद्धा निखळले.
जखमी अवस्थेत दोघांनाही तातडीने मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यावेळी अजय आढळराव हा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर प्रतीक कोकरे याच्यावर उपचार सुरू आहे. याप्रकरणी अविनाश तानाजी आढळराव यांनी फिर्यादी दिल्यानंतर इको गाडीचा चालक लालचंद दुर्गाप्रसाद गुप्ता (रा. घोडेगाव) याच्या विरोधात मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान अपघातात मृत्यू झालेल्या अजय आढळराव व त्याची पत्नी हे दोघेही मंचर येथील एका शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. त्याच्या पश्चात पत्नी, आई-वडील, बहीण व तीन वर्षाची मुलगी असा परिवार आहे. अजय आढळराव पाटील यांच्या अपघाती निधनाने लांडेवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. लांडेवाडी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष खंडेराव तात्या आढळराव पाटील यांचा अजय हा पुतण्या होता.