Lionel Messi GOAT India Tour 2025 : अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटूलिओनेल मेस्सीनं (Lionel Messi) दिल्लीतील भेटीसह भारत दौऱ्याची सांगता केली. GOAT इंडिया टूरदरम्यान कोलकाता शहरातून सुरु झालेला त्याचा दौरा दिल्लीत संपला. राजधानीतील 'द लीला पॅलेस'मध्ये आयोजित ‘मीट अँड ग्रीट’ कार्यक्रमानंतर फुटबॉल जगतात अधिराज्य गाजवणारा आणि भारतीय चाहत्यांच्या गळ्यातील ताईत असलेल्या मेस्सीनं अरुण जेटली स्टेडियमवर हजेरी लावली. यावेळी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यासह ICC चे अध्यक्ष जय शाह यांनी मेस्सीचं स्वागत केल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मेस्सीनं व्यक्त केली मनातील भावना, म्हणाला नक्कीच पुन्हा येईन
दिल्लीतील क्रिकेटच्या स्टेडियमवर फुटबॉलच्या जादूगारची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. भारत दौऱ्यात मिळालेल्या प्रेमानं फुटबॉलच्या मैदानातील सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडू अक्षरश: भारवून गेला. भविष्यात मी नक्की पुन्हा येईन असं प्रॉमिस मेस्सीनं दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवरील आपल्या खास भाषणात केले.
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
नेमकं काय म्हणाला मेस्सी?
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममधून निघण्यापूर्वी मेस्सीने स्पॅनिशमध्ये भाषण केले. यावेळी त्याने भविष्यात भारतात फुटबॉल सामना खेळण्यासाठी पुन्हा येण्याची इच्छा व्यक्त केली. GOAT इंडिया टूरदरम्यान सहकारी लुईस सुआरेझ (Luis Suarez आणि रोड्रिगो डे पॉल (Rodrigo De Paul) यांच्यासह मला जे प्रेम मिळालं ते अविस्मरणीय आहे. मेस्सी म्हणाला की, "भारतामध्ये काही दिवसांत आम्हाला खूप प्रेम आणि आपुलकी मिळाली. हे क्षण अविस्मरणीय आहेत. या खास आठवणी घेऊन आम्ही परत चाललो आहोत. एखादा सामना खेळायला किंवा दुसऱ्या कुठल्याही प्रसंगी आम्ही नक्कीच पुन्हा येऊ. हा दौरा अविश्वसनीय केल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो, असेही मेस्सी म्हणाला आहे.
ICC अध्यक्ष जय शहांकडून सन्मान; फुटबॉल दिग्गजाला त्यांनी गिफ्टसह खास निमंत्रणही दिलं
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी अरुण जेटली स्टेडियमवरील कार्यक्रमात मेस्सीसह सुआरेझ आणि डी पॉल यांची भेट घेतली. फुटबॉलचं मैदान गाजवणाऱ्या या खेळाडूंना त्यांनी टीम इंडियाची T20 वर्ल्ड कप २०२६ जर्सी भेट स्वरुपात दिली. यावेळी मेस्सीला खास १० क्रमांक जर्सी प्रदान करण्यात आली. जय शहांनी मेस्सीला भारतीय क्रिकेटपटूंच्या सह्या असलेली क्रिकेट बॅट आणि T20 वर्ल्ड कप २०२६ मधील भारत विरुद्ध अमेरिका (USA) उद्घाटन सामन्याचं निमंत्रण तिकीट देखील दिलं.