रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
By सदानंद नाईक | Updated: December 15, 2025 20:57 IST2025-12-15T20:55:55+5:302025-12-15T20:57:02+5:30
आरोपी विकी कवठणकरने केला होता खुनी हल्ला

रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
सदानंद नाईक, उल्हासनगर: जीवघेण्या खूनी हल्ल्यात जखमी झालेल्या रणजित गायकवाड यांची मृत्युशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्यावर उपचार सुरू असताना, हल्ल्यानंतर १०व्या दिवशी रविवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. योगायोगाची बाब अशी की, ज्या दिवशी गायकवाड यांचा मृत्यू झाला, त्याच दिवशी आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती पोलिसांनी दिली. हल्ल्याची घटना ४ डिसेंबर रोजी सायंकाळी घडली होती.
उल्हासनगर कॅम्प नं-५, तानाजीनगर मध्ये राहणारे समाजसेवक व पत्रकार रणजित गायकवाड हे कुटुंबातील काही सदस्यासह संध्याकाळी साडेसात वाजता संभाजी चौक परिसरातून जात होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या विकी कवठणकर याने लोखंडी रॉडने गायकवाड यांच्यावर खुनी हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गायकवाड यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर, पुढील उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात होत होते. गेल्या १० दिवसापासून मृत्युंशी झुंज देणाऱ्या गायकवाड यांचा रविवारी पहाटे मृत्यू झाला. गायकवाड याच्या मृत्युची वार्ता उल्हासनगरात धडकताच विठ्ठलवाडी पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवून फरार असलेल्या कवठणकर याला पोलिसांनी विठ्ठलवाडी बस डेपोतून अटक केली. अशी माहिती पत्रकार परिषद घेऊन पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली. न्यायालयाने आरोपीला २० डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.