Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दोन दिवस ट्रॅफिक ब्लॉक; पर्यायी मार्गाने वाहतूक वळवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 11:02 IST2026-04-23T11:01:50+5:302026-04-23T11:02:00+5:30
महामंडळामार्फत कि.मी. क्र. ५८/५०० येथे बांधण्यात आलेल्या पुलाचे शटरिंग काढणे व रंगकामाची कामे हाती घेण्यात आली आहेत

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दोन दिवस ट्रॅफिक ब्लॉक; पर्यायी मार्गाने वाहतूक वळवणार
पुणे: यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील डोंगरगाव-कुसगाव परिसरातील पुलाच्या दुरुस्ती व रंगकामासाठी येत्या दि. २३ आणि २४ एप्रिल रोजी प्रत्येकी तीन तास वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन करून पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन राज्य रस्ते विकास महामंडळाने केले आहे.
महामंडळामार्फत कि.मी. क्र. ५८/५०० येथे बांधण्यात आलेल्या पुलाचे शटरिंग काढणे व रंगकामाची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यासाठी २३ एप्रिल रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. या कालावधीत सर्व वाहने किवळे, देहूरोड, तळेगाव मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरून कुसगाव टोल प्लाझा येथून मुंबईकडे वळविण्यात येणार आहेत. तसेच २४ एप्रिल रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या वेळी सर्व वाहने कुसगाव टोल प्लाझा मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरून देहूरोड, किवळे मार्गे पुण्याकडे वळविण्यात येतील. या काळात द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना अडचण आल्यास नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य रस्ते विकास महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी तुषार अहिरे यांनी केले आहे.