बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी आज, गुरुवारी (दि. २३) मतदान होत असून, या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार रिंगणात उतरल्या आहेत. त्यांच्यासह एकूण २३ उमेदवार निवडणूक लढवत असले तरी प्रमुख विरोधी पक्षाचा दमदार उमेदवार नसल्याने ही निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
महाविकास आघाडीचाही पाठिंबा सुनेत्रा पवार यांना लाभल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विक्रमी मताधिक्य मिळवून देण्यासाठी कंबर कसली आहे. राज्यभरातील मंत्री, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते बारामतीत तळ ठोकून असून, प्रचारासाठी सर्व ताकद पणाला लावण्यात आली आहे. बारामतीच्या राजकीय इतिहासात अजित पवार यांच्या अनुपस्थितीत होत असलेली ही पहिलीच निवडणूक असल्याने वातावरण भावनिक झाले आहे. अजित पवार यांच्या पश्चात त्यांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी प्रचाराची सूत्रे हातात घेतली आहेत. तसेच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रचारात सक्रिय सहभाग घेत मतदारांना आवाहन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उपस्थित राहून महायुतीकडून पूर्ण पाठबळ असल्याचे संकेत दिले.
१९९१ मधील पोटनिवडणुकीत अजित पवार यांना मिळालेल्या विक्रमी मताधिक्याची पुनरावृत्ती करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, त्याच धर्तीवर यंदा ‘रेकॉर्डब्रेक’ मतदान मिळवण्याची रणनीती आखण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांच्या रूपाने पवार कुटुंबातील पहिली महिला विधानसभा निवडणूक लढवत असून, १९६२ नंतर बारामतीतून निवडणूक लढवणाऱ्या त्या दुसऱ्या महिला उमेदवार ठरत आहेत. १९६७ पासून सुरू झालेला पवार परिवाराचा प्रभाव आजही कायम असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, बारामती विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख ८४ हजार ५७९ मतदार असून, त्यामध्ये १ लाख ९० हजार ६८४ महिला, १ लाख ९३ हजार ८७१ पुरुष आणि २४ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. मतदानासाठी ४७८ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, ५७३ ईव्हीएम, ६२१ व्हीव्हीपॅट आणि ५७३ बॅलेट युनिट्स सज्ज ठेवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्याचे मतदान केवळ राजकीयच नव्हे, तर भावनिक दृष्ट्याही महत्त्वाचे ठरणार असून, बारामतीकर कोणाला कौल देणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Sunetra Pawar contests Baramati bypoll with MVA support, aiming for a record victory. With a weak opposition, the election seems one-sided. Emotional atmosphere as Pawar family seeks to replicate past success. Focus on high voter turnout in key constituency.
Web Summary : सुनेत्रा पवार एमवीए के समर्थन से बारामती उपचुनाव लड़ रही हैं, रिकॉर्ड जीत का लक्ष्य है। कमजोर विपक्ष के साथ, चुनाव एकतरफा लग रहा है। पवार परिवार की पिछली सफलता को दोहराने की कोशिश के साथ भावनात्मक माहौल। प्रमुख निर्वाचन क्षेत्र में उच्च मतदाता मतदान पर ध्यान केंद्रित किया गया।