NCP SP MP Supriya Sule News: विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ९ जागांसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक आहे. पण महायुतीने एक जादाचा उमेदवार दिला तर अटीतटीची लढत होऊ शकते. विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता महाविकास आघाडीतील तीन पक्षांना मिळून एकच जागा विधान परिषदेत निवडून आणता येणार आहे. यातच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेउद्धव ठाकरे यांना विधान परिषद निवडणूक लढवण्याची आग्रही विनंती केली आहे.
राज्यसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीने पाठिंबा दिला होता व ती निवडणूक बिनविरोध झाली होती. विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता महाविकास आघाडीतील तीन पक्षांना मिळून एकच जागा विधान परिषदेत निवडून आणता येणार आहे. राज्यसभेला आम्ही शरद पवारांच्या पाठीशी राहिलो आता पवार गट आणि उद्धवसेना यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आणि दुसरीकडे ही जागा उद्धव ठाकरेंसाठीच सोडावी अशी भूमिका घेतली गेली तर मविआत पेच निर्माण होईल, असे म्हटले जात आहे. यातच खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्सवर पोस्ट करत उद्धव ठाकरे यांना समर्थन असल्याचे म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी
महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे. ही निवडणूक राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच लढावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची आग्रहाची विनंती आहे. उद्धव ठाकरे हे राज्यातील ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा राज्याला तसेच सभागृहाला सदैव फायदाच होत राहील, असा आम्हा सर्वांना विश्वास आहे. उद्धव ठाकरे यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करावा ही नम्र विनंती, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
मीडियाच्या माध्यमातून याबाबत चर्चा घडवून आणणे उचित नाही
महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. या जागेवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लढणार असतील तर त्याचे स्वागत असेल. पण ते जर निवडणूक लढणार नसतील तर मग महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल याबाबत चर्चा करावी लागेल. कारण त्यानंतर येणाऱ्या राज्यसभेच्या जागी कोणत्या पक्षाचा उमेदवार असेल याबाबत ही आताच स्पष्टता करावी लागेल! महाविकास आघाडी एकसंध राहण्यासाठी तिन्ही पक्षाच्या समन्वयाने निर्णय घ्यावे लागतील. मीडियाच्या माध्यमातून याबाबत चर्चा घडवून आणणे उचित नाही, असे काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, मला जे समजते, त्यानुसार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जर पुन्हा उमेदवार असतील तर ही निवडणूक बिनविरोध होऊ शकेल. आता महाविकास आघाडीकडून खासकरून शिवसेनेकडून काय भूमिका घ्यायची या संदर्भात आम्ही महाराष्ट्रात बसून निर्णय घेऊ, असे संजय राऊतांनी म्हटले होते.
Web Summary : Supriya Sule urged Uddhav Thackeray to contest the Legislative Council election. With MVA's limited seats, NCP-Sharadchandra Pawar faction supports Thackeray's candidacy, citing his experience. Congress wants clarity on candidate selections.
Web Summary : सुप्रिया सुले ने उद्धव ठाकरे से विधान परिषद चुनाव लड़ने का आग्रह किया। एमवीए की सीमित सीटों के साथ, एनसीपी-शरदचंद्र पवार गुट ठाकरे की उम्मीदवारी का समर्थन करता है, उनके अनुभव का हवाला देता है। कांग्रेस उम्मीदवार चयन पर स्पष्टता चाहती है।