Pune Heatwave: तापमान वाढतंय! पुणेकरांनी दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नये; उष्णतेचा त्रास होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 13:30 IST2025-03-03T13:29:41+5:302025-03-03T13:30:18+5:30
Heatwave in Pune: पुणे शहरामध्ये पूर्व भाग मगरपट्टा, वडगावशेरी, कोरेगाव पार्क येथे तापमान चांगलेच वाढत असून, जिल्ह्यात शिरूरमध्ये तापमानात वाढ होत आहे

Pune Heatwave: तापमान वाढतंय! पुणेकरांनी दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नये; उष्णतेचा त्रास होण्याची शक्यता
पुणे: पुणे शहरात सध्या ३७ अंश सेल्सिअस कमाल तापमान आहे. पुढील चार-पाच दिवसांमध्ये याच्या खालीच तापमान राहील. पण दुपारच्या वेळी उन्हाचा चटका लागणार आहे. म्हणून नागरिकांनी त्या कालावधीत घराबाहेर पडू नये, अन्यथा उष्णतेचा त्रास होऊ शकतो, अशी माहिती ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यामध्येही शिरूर, कोरेगाव पार्क रविवारी (दि.२) सर्वाधिक ‘हॉट’ ठरले आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून शहरामध्ये कमाल तापमान वाढले असून, किमान तापमानही वाढले आहे. किमान तापमान १४ ते १५ अंशांवर होते, ते आता १७ अंशाच्या पुढे नोंदविले जात आहे. राज्यामध्ये सोलापूर ३७.९, मालेगाव ३७.६, जळगाव ३६.२, रत्नागिरी ३६.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
सध्या राज्यातही उष्णता जाणवत असून, ३ व ४ मार्च रोजी दक्षिणेकडून येणाऱ्या आर्द्रतेमुळे दक्षिण महाराष्ट्रात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. यानंतर उत्तर दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रवेशामुळे पुढील ४-५ दिवस राज्यातील दिवसभराचे तापमान कमी होण्याची शक्यता आहे, असे कश्यपी यांनी सांगितले.
शहरात येथे अधिक तापमान !
गेल्या तीन-चार वर्षांपासून पुणे शहरामध्ये पूर्व भाग मगरपट्टा, वडगावशेरी, कोरेगाव पार्क येथे तापमान चांगलेच वाढत आहे. त्या परिसरात सर्वाधिक तापमानाची नोंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. स्थानिक पातळीवरील बदल हा येथील अधिक तापमानाचे कारण असू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
पुण्यातील कमाल तापमान
शिरूर : ३८.२
कोरेगाव पार्क : ३८.१
पुरंदर : ३७.४
चिंचवड : ३६.८
मगरपट्टा : ३६.५
शिवाजीनगर : ३६.२
एनडीए : ३५.८
वडगावशेरी : ३५.७
हवेली : ३५.६
लोणावळा : ३५.४
पाषाण : ३५.०
बारामती : ३५.२
भोर : ३४.३