पिकासोबत जमीनही वाहून गेली, दुष्काळ ओला की सुका? त्यापेक्षा मदत महत्त्वाची - बाबा आढाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 11:13 IST2025-10-04T11:12:52+5:302025-10-04T11:13:14+5:30
केवळ पीकच नाही, तर पिकाखालची जमीनही वाहून गेली आहे. असे असताना सरकार मात्र दुष्काळ ओला की सुका, त्यासाठी नियमात काय तरतूद आहे? असे शब्दांचे खेळ करत आहे

पिकासोबत जमीनही वाहून गेली, दुष्काळ ओला की सुका? त्यापेक्षा मदत महत्त्वाची - बाबा आढाव
पुणे : अंत:करण ओले असले की दुष्काळ ओला की सुका? असा प्रश्न पडणार नाही, अशी टीका करत ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी पावसाने पीडित शेतकऱ्यांना त्वरित मदत करावी, अशी मागणी केली.
पुरोगामी पक्ष संघटनांच्या वतीने पुणे रेल्वे स्थानकातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ गुरुवारी गांधी जयंतीदिनी दुपारपर्यंत धरणे धरण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते. त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. डॉ. आढाव स्वतः वयाच्या ९४ व्या वर्षी आंदोलनात सहभागी झाले होते. ते म्हणाले, मराठवाड्यासारख्या दुष्काळप्रवण प्रदेशात पावसाळ्यातही जेमतेम पडणारा पाऊस काळ बनून आला आहे. केवळ पीकच नाही, तर पिकाखालची जमीनही वाहून गेली आहे. असे असताना सरकार मात्र दुष्काळ ओला की सुका, त्यासाठी नियमात काय तरतूद आहे? असे शब्दांचे खेळ करत आहे. ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मदतीसाठी म्हणून हमाल पंचायतीच्या विविध संस्थांच्या वतीने मदतीचा धनादेश देण्यात आला. दुपारी १ पर्यंत अशाच मदतीतून २ लाख रूपये जमा झाले. ज्ञानेश्वरी पवार या चिमुकलीने आपल्या खाऊच्या पैशातून मदत दिली.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दिवंगत जी. जी. पारीख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. समितीचे निमंत्रक नितीन पवार यांनी आंदोलनाची माहिती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भुयारी मार्ग पथारी पंचायतीने संयोजन केले.