शाळेपासून अवघ्या २ पावलांवर घर; होत्याचं नव्हतं झालं, घर समोर दिसताना काळाची झडप अन् तिघांचा अंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 15:40 IST2025-12-03T15:39:27+5:302025-12-03T15:40:42+5:30
मेहनती आयुष्य जगत मुलांना मोठं करण्याची जिद्द उराशी बाळगलेल्या प्रसाद कुटुंबाचं मात्र अपघाताने क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं.

शाळेपासून अवघ्या २ पावलांवर घर; होत्याचं नव्हतं झालं, घर समोर दिसताना काळाची झडप अन् तिघांचा अंत
हिंजवडी : शाळा सुटल्यावर आनंदात घरी जात असताना अवघ्या दोन पावलांवर घर; मात्र घरात जाण्याआधी काळाने घाला घातला. शिवाजी चौकातून वाकडच्या दिशेने भरघाव वेगात जाणाऱ्या खासगी बसने तीनही भावंडांना चिरडले आणि प्रसाद कुटुंबाचं होत्याचं नव्हतं झालं.
सूरज देवा प्रसाद (वय ६), अर्चना देवा प्रसाद (११) आणि प्रिया देवा प्रसाद (१६) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भावंडांची नावे आहेत. दरम्यान, मूळचे उत्तर प्रदेशातील कुटुंब काही वर्षांपूर्वी व्यवसायानिमित्त हिंजवडीत पंचरत्न चौकातील वाघिरे चाळीत भाड्याच्या खोलीत स्थायिक झाले होते. लाँड्री व्यवसाय असल्याने परिसरातील अनेकांशी प्रसाद कुटुंबाचे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध तयार झाले होते. मेहनती आयुष्य जगत मुलांना मोठं करण्याची जिद्द उराशी बाळगलेल्या प्रसाद कुटुंबाचं मात्र, सोमवारी (दि. १) सायंकाळी क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं.
चार बहिणी अन् एकुलता एक सूरज
चार बहिणींनंतर सूरजचा जन्म झाल्याने प्रसाद कुटुंबाचा तो लाडका होता. सूरजला नुकतेच हिंजवडीतील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीमध्ये दाखल केले होते. रोज, शाळेतील नवनवीन गमती-जमती आई-वडिलांना सांगत त्याचा शालेय प्रवास सुरू झाला होता. घटनेच्या दिवशीसुद्धा अगदी हसत-खेळत पाठीवर शाळेची बॅग घेऊन आपल्या बहिणींबरोबर आनंदात घराच्या ओढीने निघालेल्या सूरजवर काळाने झडप घातली. घर आणि वडिलांचे दुकान समोर दिसत असताना घरात पोहोचण्याआधीच तिन्ही भावंडांवर काळाने झडप घातली.