देशाच्या नेतृत्वाने शेजारी देशांबरोबर चांगले संबंध ठेवले नाहीत; शरद पवारांची सरकारवर टीका

By राजू इनामदार | Updated: June 10, 2025 19:12 IST2025-06-10T19:11:33+5:302025-06-10T19:12:15+5:30

पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश यांच्याबरोबरही आपले संबध आता नीट नाहीत, चीनचा आक्रमकपणा चिंता करण्यासारखा आहे

The country's leadership has not maintained good relations with neighboring countries; Sharad Pawar criticizes the government | देशाच्या नेतृत्वाने शेजारी देशांबरोबर चांगले संबंध ठेवले नाहीत; शरद पवारांची सरकारवर टीका

देशाच्या नेतृत्वाने शेजारी देशांबरोबर चांगले संबंध ठेवले नाहीत; शरद पवारांची सरकारवर टीका

पुणे: पंडित नेहरू यांच्या काळात आपले शेजारी देशांबरोबर अतिशय चांगले संबध होते. तसे ते आता राहिलेले नाहीत, सुसंवाद आहे असे म्हणण्याची स्थिती नाही. देशाच्या नेतृत्वाने ते ठेवले नाहीत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष पक्षाच्या २६ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात केंद्र सरकारवर केली.

पवार म्हणाले, “पहेलगाम हल्ला झाला त्यावेळी आम्ही सरकारवर टीका केली नाही. देशाच्या नागरिकांवर हल्ला केला जातो, त्याला उत्तर देण्यासाठी सरकारने कोणताही कृती केली तरी आम्ही बरोबर राहिलो. पण तुम्ही देशाचा नकाशा समोर ठेवा. काश्मिर अशांत आहे. त्याशिवाय ज्या बांगलादेशाची निर्मिती आपण केली तो बांगलादेशही आपल्याबरोबर चांगला राहिलेला नाही. तसेच पाकिस्तान, श्रीलंका यांच्याबरोबरही आपले संबध आता नीट नाहीत. चीनचा आक्रमकपणा चिंता करण्यासारखा आहे.”

देशाच्या भल्यासाठी काही स्पष्ट भूमिका घ्यावी लागते असे मत व्यक्त करून पवार म्हणाले, “समाजाच्या सर्व थरामध्ये विश्वास निर्माण करण्याची गरज आहे. हातात हात घालुन काम करण्याचा हा काळ आहे. सर्वांना बरोबर घेऊन निर्णय घेत व्हायला हवेत.”

पुन्हा सत्ता मिळेल

पक्षात फुट पडली मात्र मी चिंता करत नाही, आपण एकसंध राहिलो, जनतेच्या कामाशी बांधिलकी ठेवली तर सत्ता आपोआप येईल. राज्याची, देशाची स्थिती चिंताजनक आहे. अशा वेळी सर्वांना बरोबर घेत काम करण्याची आपली जबाबदारी आहे. त्यासाठी कर्तृत्ववान चेहऱ्यांना संधी देऊ. यातून नव्या नेतृत्वाची फळी उभी राहील आणि राज्यात पुन्हा सत्ता मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. 

Web Title: The country's leadership has not maintained good relations with neighboring countries; Sharad Pawar criticizes the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.