पुणे : आर्थिक अडचणी, सामाजिक पूर्वग्रह, अभ्यासासाठी जागेचा अभाव आणि प्रतिकूल वातावरण अशा अनेक संकटांवर मात करत कचरावेचकांच्या मुलामुलींनी यंदाच्या दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. जिद्द, मेहनत आणि पालकांच्या कष्ट आणि प्रेरणाच्या जोरावर या विद्यार्थ्यांनी यशाची नवी कहाणी लिहिली आहे.
यंदा दहावीच्या परीक्षेला बसलेल्या १९९ विद्यार्थ्यांपैकी १०९ मुले आणि ९० मुलींचा समावेश होता. त्यापैकी ८४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे शिक्षण अर्धवट राहिलेल्या ११ जणांनी ‘१७ नंबर फॉर्म’ भरून बाह्य विद्यार्थीदशेतून परीक्षा देत पुन्हा शिक्षणाची वाट धरली. त्याचबरोबर तीन कचरावेचक महिलांनीही स्वतःचे दहावी पूर्ण करण्याचे स्वप्न यंदा साकार केले. कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत संघटना आणि स्वच्छ संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वर्षभर शैक्षणिक मदत करण्यात आली.
क्लासशिवाय ८९ टक्के गुणांची कामगिरी
शिवाजीनगर येथील पाटील इस्टेटमध्ये राहणाऱ्या खुशी गणेश खुपटे हिने कोणताही क्लास न लावता दहावीत ८९ टक्के गुण मिळवले. तिची आई कावेरी खुपटे या कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत संघटनेच्या सभासद असून, कचरा गोळा करण्याचे काम करून दोन मुलांचा सांभाळ करतात. स्वतः अभ्यास करण्यावर माझा विश्वास आहे. आईने प्रत्येक टप्प्यावर मला आधार दिला. प्रेरणा बाहेर शोधायची नसते, ती स्वतःमध्येच असते,” असे खुशीने सांगितले.
आई-वडिलांच्या कष्टांना यशाची जोड
सिंहगडरोड परिसरातील सार्थक मेश्राम चंदनशिवे याने दहावीत ८६.६० टक्के गुण मिळवत आई-वडिलांच्या मेहनतीचे चीज केले. त्याची आई साधना मेश्राम चंदनशिवे या स्वच्छ संस्थेच्या सभासद असून, वडील मजुरीची कामे करतात.
“वडिलांची स्वप्ने पूर्ण करणार”
निगडी येथील तनू भारत तरकसे हिने ८१.८० टक्के गुण मिळवले. शिक्षणाची आवड असलेल्या तनूने स्वतःसोबत आपल्या लहान भावाचाही अभ्यास घेतला. तिचे वडील गेली आठ वर्षे घंटागाडीवर काम करत आहेत. वडिलांचे कष्ट मला माहिती आहेत. त्यांची सर्व स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी अधिक मेहनत घेणार,” असे तनूने सांगितले.
मुलांना शिकवताना स्वतःही दहावी उत्तीर्ण
संघटनेने आयोजित केलेल्या ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटातून प्रेरणा घेत वर्षा ओव्हाळ यांनी स्वतः दहावीची परीक्षेचा देण्याचा निर्णय घेतला. दोन मुलांची जबाबदारी सांभाळत त्यांनी रात्रशाळेत शिक्षण घेतले आणि ४६ टक्के गुणांसह परीक्षा उत्तीर्ण केली.
आई-मुलाची एकत्र यशस्वी भरारी
वानवडी परिसरात कचरासंकलनाचे काम करणाऱ्या अर्चना विकास घोडके यांनी मुलगा यशसोबत यंदा दहावीची परीक्षा दिली. अनेक वर्षांपूर्वी शिक्षण अर्धवट सोडलेल्या अर्चना यांनी पुन्हा शिक्षण सुरू करत सकाळी काम आणि रात्री अभ्यास असा दिनक्रम सांभाळला. त्यांनी ६० टक्के गुण मिळवले, तर मुलगा यशने ५४ टक्के गुणांसह परीक्षा उत्तीर्ण झाला.
Web Summary : Overcoming hardship, Pune's waste pickers' children achieved an 84% pass rate in the SSC exam. Parents' hard work and educational support from organizations fueled their success. Some women waste pickers also cleared their 10th grade.
Web Summary : पुणे में कचरा बीनने वाले बच्चों ने कठिनाइयों को पार करते हुए एसएससी परीक्षा में 84% उत्तीर्ण दर प्राप्त की। माता-पिता की मेहनत और संगठनों के शैक्षणिक समर्थन ने उनकी सफलता को बढ़ावा दिया। कुछ महिला कचरा बीनने वालों ने भी 10वीं कक्षा उत्तीर्ण की।