लोखंडी सळ्या थेट स्कुल बसमध्येच घुसल्या; भयानक अपघात, सुदैवाने सगळे बचावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 19:24 IST2025-10-08T19:22:19+5:302025-10-08T19:24:54+5:30
सोलापूर-पुणे महामार्गावरून जात असताना समोर अचानक दुचाकीस्वार आडवा आल्याने चालकाने तातडीने ब्रेक लावला, त्यामुळे पाठीमागून येणारी लोखंडी सळया भरलेली पिकअप बसला धडकली

लोखंडी सळ्या थेट स्कुल बसमध्येच घुसल्या; भयानक अपघात, सुदैवाने सगळे बचावले
उरुळी कांचन: सोलापूर-पुणे महामार्गावरील जीबी चौधरी डेव्हलपर्स समोर बुधवारी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास एका स्कूल बसला भीषण अपघात झाला. या अपघातात ऑलिंपस स्कूलच्या बसमधील आठ विद्यार्थी आणि एक शिक्षिका किरकोळ जखमी झाले असून, दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑलिंपस स्कूलची बस सोलापूर-पुणे महामार्गावरून जात असताना समोर अचानक एक दुचाकीस्वार आडवा आल्याने चालकाने तातडीने ब्रेक लावला. त्यामुळे पाठीमागून येणारी लोखंडी सळया भरलेली पिकअप बसला धडकली. त्याचवेळी पिकअपनेही जोरदार धडक दिल्याने मागून येणाऱ्या हायवा ट्रकने पिकपला जोरदार धडक दिली. या धडकेत पिकपमधील सळया बसमध्ये घुसल्यामुळे विद्यार्थी जखमी झाले. या अपघातात शाळेतील आठ विद्यार्थी आणि एक शिक्षिका किरकोळ जखमी झाले असून, त्यांना चिंतामणी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. मात्र दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याने त्याला विश्वराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळी तात्काळ शाळेच्या मुख्याध्यापिका आणि उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी दाखल झाले. त्यांनी तातडीने सर्व वाहने रस्त्याच्या कडेला हलवून वाहतूक सुरळीत केली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही.