अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 21:03 IST2026-01-14T21:00:43+5:302026-01-14T21:03:58+5:30
Iran-America: मध्य पूर्वेतील भू-राजकीय तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला आहे.

अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
Iran-America: मध्य पूर्वेतील भू-राजकीय तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. इराणच्या भोवती अमेरिकेचे असंख्य लष्करी तळ पसरलेले असल्याने, थेट संघर्ष झाला तर इराणला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते, अशी चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू आहे. कतार, बहरीन, कुवैत, संयुक्त अरब अमीरात, इराक, सौदी अरेबिया, जॉर्डन आणि तुर्कीतील अमेरिकेचे लष्करी तळ प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे इराणला वेढा घालत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, अमेरिकेच्या संभाव्य कारवाईच्या पार्श्वभूमीवर इराणने म्हटले की, अमेरिकेने हल्ला केला, तर मध्य पूर्वेतील अमेरिकी तळांवर प्रत्युत्तरादाखल हल्ले केले जातील, असा इशारा दिला. हा इशारा अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर देण्यात आला आहे.
मध्य पूर्वेतील प्रमुख अमेरिकी लष्करी तळ
बहरीन : पाचव्या नौदल ताफ्याचे मुख्यालय
बहरीनमध्ये अमेरिकन नौदलाच्या फिफ्थ फ्लीटचे मुख्यालय आहे. हा ताफा फारसी आखात, लाल समुद्र, अरब सागर आणि हिंदी महासागराच्या काही भागांची जबाबदारी सांभाळतो. समुद्री सुरक्षेच्या दृष्टीने हा तळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
कतार : अल उदीद एअर बेस
कतारची राजधानी दोहाजवळील वाळवंटी भागात अल उदीद एअर बेस आहे. येथे अमेरिकन सेंट्रल कमांडचे मुख्यालय आहे. इथे सुमारे १० हजार अमेरिकी सैनिक तैनात असून, इजिप्तपासून कझाकस्तानपर्यंतच्या प्रदेशातील अमेरिकी लष्करी कारवाया येथून नियंत्रित केल्या जातात. अलीकडेच येथे हवाई व क्षेपणास्त्र संरक्षण मजबूत करण्यासाठी नवे समन्वय केंद्र सुरू करण्यात आले आहे.
कुवैत : अमेरिकन आर्मीचे केंद्र
कुवैतमध्ये कॅम्प अरिफजान हा अमेरिकन आर्मी सेंट्रलचा मुख्य तळ आहे. अली अल सलेम एअर बेस इराक सीमेपासून सुमारे 40 किमी अंतरावर असून, कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे याला “द रॉक” असेही म्हटले जाते. याशिवाय कॅम्प ब्यूहरिंग हा इराक व सीरियामध्ये पाठवण्यात येणाऱ्या सैन्यासाठी महत्त्वाचा स्टेजिंग पॉइंट आहे.
संयुक्त अरब अमीरात : हवाई व नौदल ताकद
संयुक्त अरब अमीरातमधील अबू धाबीच्या दक्षिणेला अल धफरा एअर बेस आहे. हा तळ यूएई व अमेरिकन हवाई दल संयुक्तपणे वापरतात. दुबईतील जेबेल अली पोर्ट अधिकृत लष्करी तळ नसला, तरी मध्य पूर्वातील अमेरिकन नौदलाचा सर्वात मोठा बंदर म्हणून ओळखला जातो.
इराक : संघर्षाचा केंद्रबिंदू
इराकमधील एन अल असद एअर बेस अनबार प्रांतात आहे. 2020 मध्ये इराणने याच तळावर क्षेपणास्त्र हल्ला केला होता. कुर्दिस्तान भागातील एरबिल एअर बेस हा प्रशिक्षण आणि गुप्तचर माहितीच्या देवाणघेवाणीसाठी महत्त्वाचा मानला जातो.
सौदी अरेबिया : क्षेपणास्त्र संरक्षण
सौदी अरेबियामध्ये 2024 मध्ये सुमारे 2321 अमेरिकी सैनिक तैनात होते. रियाधपासून सुमारे 60 किमी अंतरावरील प्रिन्स सुल्तान एअर बेसवर पॅट्रियट क्षेपणास्त्रे आणि THAAD प्रणाली तैनात आहेत.
जॉर्डन आणि तुर्की
जॉर्डनमध्ये मुवाफ्फक अल साल्टी एअर बेसवर अमेरिकन हवाई दलाची 332 वी एअर एक्सपेडिशनरी विंग कार्यरत आहे. तर, तुर्कीमधील इन्सिरलिक एअर बेस अमेरिकेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानला जातो, कारण येथे अण्वस्त्रे साठवलेली असल्याची चर्चा आहे.