Pune: पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद; नितीन गडकरींच्या ताफ्यात केवळ 5 गाड्या, 'बस'नेही केला प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 14:13 IST2026-05-14T14:13:17+5:302026-05-14T14:13:33+5:30
'आम्ही केवळ रस्ते बांधत नाही, तर भक्तीच्या वाटेवर वारकऱ्यांचा प्रवास सुकर करीत आहोत', असे गडकरी यांनी यावेळी सांगितले

Pune: पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद; नितीन गडकरींच्या ताफ्यात केवळ 5 गाड्या, 'बस'नेही केला प्रवास
पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामाची पाहणी दौरा केला. आज गुरुवारी सकाळी हडपसर ते फलटण या मार्गावर आपल्या कृतीतून नवा आदर्श घालून देत केवळ 5 गाड्यांचा ताफ्यात वाहने होती.
वाहनांच्या संख्येत कपात करून स्वतः 'बस'ने प्रवास करत कामाचा आढावा घेतला. दिवे घाट येथील झेंडेवाडी संत ज्ञानेश्वर पालखी विसावा मार्ग या ठिकाणी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांनी निवेदन देऊन या मार्गाच्या ठिकाणी चार अपघात झाल्याचे सांगितले. यावेळी गडकरीं यांनी राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना सूचना दिला.
इंधन बचतीचा 'पुणे पॅटर्न'
जागतिक स्तरावर, विशेषतः पश्चिम आशियातील तणावामुळे उद्भवलेले इंधन संकट आणि वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी मंत्र्यांना आणि प्रशासनाला काटकसरीचा सल्ला दिला होता. या आवाहनाची अंमलबजावणी करत गडकरी यांनी आज त्यांच्या दौऱ्यात व्हीआयपी गाड्यांचा ताफा कमी ठेवण्याचे आदेश दिले होते.
अधिकारी आणि पत्रकारांसह 'बस' प्रवास
नेहमीप्रमाणे गाड्यांचा मोठा ताफा न घेता, गडकरी यांनी त्यांच्या सुरक्षा रक्षकांसह, प्रकल्पाचे अधिकारी आणि निमंत्रित पत्रकारांना सोबत घेऊन दोन बसमधून प्रवास केला. हडपसर, दिवे घाट आणि सासवड परिसरातील पालखी मार्गाच्या कामांची त्यांनी यावेळी पाहणी केली. ताफ्यातील गाड्या कमी झाल्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीला होणारा अडथळाही लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे दिसून आले.
पालखी मार्ग प्रकल्पाचा आढावा
पाहणी दरम्यान गडकरी यांनी संबंधित कंत्राटदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) अधिकाऱ्यांशी चर्चा केली. वारीच्या काळात वारकऱ्यांच्या सोयीसाठी रस्त्याचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच "आम्ही केवळ रस्ते बांधत नाही, तर भक्तीच्या वाटेवर वारकऱ्यांचा प्रवास सुकर करीत आहोत," असे यावेळी म्हणाले.