इंदापूर: चारित्र्यावरुन संशय घेत असह्य शारिरीक व मानसिक करणाऱ्या सासरच्या लोकांनी पोटात दुखत असताना देखील दवाखान्यात नेले नसल्याने अठरा वर्षांच्या गरोदर नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी (दि.२७) दुपारी वरकुटे बुद्रुक गावात घडला. या प्रकरणी तिचा नवरा, सासू व दीर यांच्या विरुध्द इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवानी विकास शिंदे (वय १८ वर्षे,रा.वरकुटे बुद्रुक, ता.इंदापूर) असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी नवविवाहितेचे नाव आहे. तिची आई दीपाली रामचंद्र जामदार(रा.बेलवाडी, ता.इंदापूर) हिने दिलेल्या फिर्यादीच्या अनुषंगाने शिवानीचा नवरा विकास अजिनाथ शिंदे, दीर प्रकाश अजिनाथ शिंदे व सासू सुरेखा अजिनाथ शिंदे (तिघे रा वरकुटे बुद्रुक,ता. इंदापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी सांगितले की, २०२५ मध्ये शिवानीचा विकास बरोबर विवाह झाला होता. त्यासाठी तिच्या घरच्यांनी ११ तोळे सोने व प्रापंचिक साहित्य देऊन एकूण १५ लाख रुपये खर्च केला होता. लग्नानंतर दोन महिने चांगले नांदवले. त्यानंतर तिच्या चारित्र्यावर संशय घेत,मोबाईल तपासणे, फोनवर सतत कोणाबरोबर बोलतेस अशी विचारणा करत मारहाण करणे असा प्रकार विकास करु लागला. दीर प्रकाश व सासू सुरेखा हे दोघे तिला घालून पाडून बोलू लागले. दरम्यान जेवणाच्या कारणावरुन या सर्वांनी शिवानीला मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. याबाबत शिवानीने तिच्या आई वडीलांना कल्पना दिली होती. तिच्या आईने सर्वांना समजावून सांगून महिनाभरासाठी शिवानीला माहेरी आणले होते. सासरहून फोन आल्यानंतर तिला नांदायला ही पाठवले होते. पंधरा दिवस चांगले नांदवल्यानंतर फिल्टर पाण्याचा प्लॅन्ट टाकण्यासाठी विकासने माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये असे शिवानीला सांगितले. ती मागणी पूर्ण करण्यासाठी तिचा छळ होऊ लागला, म्हणून तिच्या घरच्यांनी प्लॅन्टसाठी पन्नास हजार रुपये दिले. पुढील पंधरा दिवस चांगले नांदवल्यानंतर शिवानी गरोदर असताना, सासरच्या मंडळींकडून तिला त्रास देणे सुरु होते.
दि.२७ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता शिवानीने तिच्या आईला फोन करुन, पोटात खुप दुखतेय, पण मला दवाखान्यात न नेता, सासरच्या मंडळीकडून त्रास दिला जात आहे, असा फोन केला. त्यावेळी तिची आई दवाखान्यात ॲडमिट होती. त्यानंतर दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास शिवानीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची माहिती विकासने दिली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
Web Summary : A pregnant 18-year-old in Indapur committed suicide due to dowry harassment. Her husband, mother-in-law, and brother-in-law are booked after she was denied medical care despite severe pain.
Web Summary : इंदापुर में दहेज उत्पीड़न से तंग आकर एक गर्भवती 18 वर्षीय महिला ने आत्महत्या कर ली। गंभीर दर्द होने के बावजूद उसे चिकित्सा सुविधा से वंचित रखा गया, जिसके बाद पति, सास और देवर के खिलाफ मामला दर्ज किया गया।