कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणी गेल्या तीन दिवसांपासून गाजत असलेल्या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. बजरंग दलाचे विभागीय समन्वयक निलेश श्रीकांत शिंदे (वय.३०, रा.रोहिदास गल्ली शिरोली ) यांना अज्ञात दोघांनी मोटारसायकल वरून येऊन पिस्तूल लावली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत पश्चिम बाजूच्या सेवा मार्गावर हॉटेल भाग्यश्री शेजारी घडली. याबाबत शिरोली पोलीस ठाण्यात निलेश शिंदे याची तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे. या घटनेमुळे शिरोली पोलीस ठाण्यात हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित झाले होते. त्यावेळी पोलीस आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते यांच्यात दोन तास गोंधळ उडाला होता.
गेल्या चार दिवसापासून शिरोली गावात हिंदू तरुणीवर लैंगिक शोषण करणाऱ्या शाहीद सनदे आणि शाहरुख देसाई यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे गावात तणावाचे वातावरण आहे. मोठा पोलीस बंदोबस्त आहे.
निलेश शिंदे, विश्व हिंदू परिषदेचे माजी समन्वय कुंदन पाटील यांना कोल्हापुरात भेटण्यासाठी गेले होते. त्यांची भेट घेऊन ते शिरोलीच्या दिशेने सकल हिंदू समाजाच्या वतीने, कालिका मंगल कार्यालय आयोजित एका बैठकीसाठी येत होते. निलेश पश्चिम बाजूच्या सेवा मार्गावरून शिरोलीच्या दिशेने येत असताना मागून मोटरसायकल वरून दोन अज्ञात तरुण तोंडाला काळे मास्क लावून आले आणि त्यांनी निलेश यांना आडवी गाडी लावून थांबवले या प्रकरणात तू पुढे पुढे करू नकोस तुला महागात पडेल, असे म्हणून त्यांनी त्यांच्यावर पिस्तूल रोखली आणि जीवे मारण्याची धमकी देऊन पसार झाले. यावेळी निलेश यांनी शिरोली पोलिसांना फोन करून घडला प्रकार सांगितला आणि थेट पोलीस ठाणे गाठले.
हा घडला प्रकार कालिका मंगल कार्यालय येथे सुरू असलेल्या बैठकीत सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांना समजल्यावर बैठकीतून उठून सर्व कार्यकर्त्यांनी पोलीस ठाणे गाठले त्यामुळे पोलीस ठाण्याच्या आवारात एकच गोंधळ उडाला. निलेश शिंदे यांनी घडला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे.
यावेळी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी निलेश शिंदे, योगेश खाडे यांना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी केली. करवीर पोलीस उपाधीक्षक क्षीरसागर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिरोलीचे तंटामुक्त अध्यक्ष सतीश पाटील, माजी उपसरपंच कृष्णात करपे, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, उपसरपंच विजय जाधव शिव प्रतिष्ठानचे समन्वयक सुरेश यादव, प्रकाश कौंदाडे, दीपक रानमाळे, मुकुंद नाळे, अविनाश कोळी, राहुल अष्टेकर यांच्यासह हजारो हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते.
Web Summary : Kolhapur's girl exploitation case intensifies. Bajrang Dal's Nilesh Shinde received death threats, sparking protests. Police investigate, tensions high in Shiroli.
Web Summary : कोल्हापुर में लड़की शोषण मामले में बजरंग दल के नेता नीलेश शिंदे को जान से मारने की धमकी मिली, जिससे विरोध प्रदर्शन शुरू हो गया। पुलिस जाँच कर रही है, शिरोली में तनाव।