पुणे: पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये सध्या ९.५८ टीएमसी पाणीसाठा आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत हा पाणीसाठा जास्त आहे. त्यामुळे येत्या ३१ मेपर्यंत पुण्याच्या पाण्यात कपात केली जाणार नाही, असा निर्णय महापौर मंजूषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. वेधशाळेचा पावसाचा अपडेट अंदाज आणि पाणीसाठ्याची स्थिती पाहून ३१ मेनंतर आढावा बैठक घेऊन पाणी कपात करायची की नाही? याचा निर्णय घेतला जाणार आहे.
पावसाळा उशिरा सुरू झाल्यास उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यासाठी महापौर मंजूषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी सभागृहनेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते नीलेश निकम, काँग्रेसचे गटनेते चंदू कदम, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे गटनेते काका चव्हाण, आरपीआयच्या गटनेत्या हिमाली कांबळे, आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, खडकवासला विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख, उपअभियंता मोहन भदाने आदी उपस्थित होते. शहराला खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो.
महापालिका रोज १,५६० दशलक्ष लीटर पाणी उचलते. त्यानुसार महिन्याला १.६५ टीएमसी पाणी दर महिन्याला उचलले जाते. जलसंपदा विभागाच्या सूचनेनुसार आता महापालिकेला ०.२७५ टीएमसीची पाणीकपात करावी लागणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जादा पाणीसाठा शिल्लक आहे. यंदाच्या मान्सूनवर ‘अल-निनो’ व ‘आयओडी’चा प्रभाव असल्याने एकूण पाऊसमान कमी असेल, असा इशारा दिला आहे. त्यानुसार खडकवासला विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी महापालिकेला याबाबत महिन्याच्या उचलण्यात येणाऱ्या पाणी कोट्यात १५ टक्के पाणीकपात करण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिकेला नोटीस देण्यात आल्यानंतर त्यावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. कितीही नोटीस आल्या तरी पुणेकरांचा एक थेंबदेखील कमी होऊ देणार नाही, अशी भूमिका स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी घेतली होती. या सर्व पाश्वभूमीवर पावसाळा उशिरा सुरू झाल्यास उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यासाठी आढावा बैठक झाली. पाणीसाठा, जलशुद्धीकरण व्यवस्था, वितरण प्रणाली तसेच संभाव्य पाणीटंचाईच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणामध्ये आज ९.५८ टीएमसी पाणीसाठा आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत हा पाणीसाठा जास्त आहे. त्यामुळे येत्या ३१ मेपर्यंत पुण्याच्या पाण्यात कपात केली जाणार नाही, असा निर्णय सर्वानुमते घेतल्याचे महापौर मंजूषा नागपुरे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
३१ मेनंतर पाण्याचा आढावा घेणार
वेधशाळेचा पावसाचा अपडेट अंदाज आणि पाणीसाठ्याची स्थिती पाहून ३१ मेनंतर आढावा बैठक घेऊन पाणीकपात करायची की नाही? याचा निर्णय घेतला जाणार आहे.
पुणेकरांना आवाहन, पाणी जपून वापरा
पुणे शहरात ३१ मेपर्यंत पाणीकपात केली जाणार नाही. तरीही पुणेकरांनी विशेष करून महिला वर्गाने पाणी जपून वापरावे असे आवाहन महापौर मंजूषा नागपुरे यांनी केले आहे.
पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
पावसाळ्यात वाढणाऱ्या गढूळपणाच्या पार्श्वभूमीवर पाणी शुद्धीकरण प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्यात येत आहेत. समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जुन्या हद्दीसोबतच नव्याने समाविष्ट गावांमध्ये पायाभूत सुविधा उभारण्याचे काम सुरू असून, त्यामध्ये जलशुद्धीकरण केंद्र, पंपिंग स्टेशन, पाण्याच्या टाक्या व वितरण लाइन उभारण्यात येणार आहेत. शहरातील १७ जलशुद्धीकरण प्रकल्पांची देखभाल, क्लेरीफायर व फिल्टर बेडची स्वच्छता तसेच यंत्रणांची दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आहे. पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी एआय आधारित लीक डिटेक्शन, रोबोटिक कॅमेरा तपासणी, वाहन ट्रॅकिंग प्रणाली व मोबाइल ॲपद्वारे नियंत्रण यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. आगामी मान्सून काळात कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना राबविण्यावर विशेष भर देण्यात आला, असे महापौर मंजूषा नागपुरे यांनी सांगितले.
वर्ष == धरणातील ५ मे रोजीचा पाणीसाठा
२०२६ == ९.५८
२०२५ == ८.९०
२०२४ == ८.१६
Web Summary : Pune residents get relief! Water cut averted until May 31st due to ample dam storage, exceeding last three years' levels. Future cuts depend on rainfall updates.
Web Summary : पुणेवासियों को राहत! बांधों में पर्याप्त जल भंडारण के कारण 31 मई तक पानी की कटौती नहीं होगी, जो पिछले तीन वर्षों के स्तर से अधिक है। भविष्य में कटौती बारिश के अपडेट पर निर्भर करेगी।