NEET Exam Paper Leak: ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील मनीषा मांढरेला १४ दिवसांची ‘सीबीआय’ कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 11:55 IST2026-05-18T11:53:56+5:302026-05-18T11:55:30+5:30
NEET Exam Paper Leak परीक्षा प्रक्रियेशी संबंधित असल्याने मनीषा मांढरे हिचा वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र या विषयांच्या प्रश्नपत्रिकांशी संबंध होता.

NEET Exam Paper Leak: ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील मनीषा मांढरेला १४ दिवसांची ‘सीबीआय’ कोठडी
पुणे : ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्याच्या माॅडर्न महाविद्यालयातील जीवशास्त्राच्या अध्यापक मनीषा गुरुनाथ मांढरे हिला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली हाेती. अधिक तपासासाठी सीबीआय विशेष न्यायालयाने मांढरे हिला चौदा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
परीक्षा प्रक्रियेशी संबंधित असल्याने मनीषा मांढरे हिचा वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र या विषयांच्या प्रश्नपत्रिकांशी संबंध होता. नीट पेपर फुटीचा प्रकार समाेर येताच पुण्यातील बिबवेवाडी परिसरातून ब्युटीपार्लरचालक महिला मनीषा वाघमारे हिला अटक केली गेली. वाघमारे हिने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मनीषा मांढरे हिला घरी बोलवले होते. तेथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रश्न व अचूक उत्तरांची माहिती दिल्याचे उघड झाले. त्यानंतर मांढरेला अटक करून तपास अधिकारी उपअधीक्षक पवन कुमार यांनी रविवारी मांढरे हिला दिल्लीतील विशेष ‘सीबीआय’ न्यायालयात हजर केले.
याप्रसंगी ‘सीबीआय’कडून ॲड. व्ही. के. पाठक आणि दर्शन लाल यांनी बाजू मांडली. ‘या प्रकरणात मुख्य सूत्रधार प्रा. पी. व्ही. कुलकर्णी, तसेच ब्युटीपार्लरचालक महिला मनीषा वाघमारे हिला अटक केली आहे. आरोपी मांढरे ही परीक्षाप्रकियेशी (एनटीए) संबंधित आहे. विशेष मार्गदर्शनाच्या नावाखाली तिने विद्यार्थ्यांकडून पैसे घेतले हाेते. या प्रकरणात आतापर्यंत नऊ आरोपींना अटक केली असून, सखोल तपास करायचा आहे. आरोपींची एकत्र चौकशी करायची आहे. तेव्हा तपासासाठी चौदा दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात यावी, अशी विनंती ॲड. पाठक आणि ॲड. लाल यांनी केली. त्यावर विशेष न्यायाधीश रश्मी कुजूर यांनी मांढरेला चौदा दिवस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
दरम्यान, ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार प्रा. पी. व्ही. कुलकर्णी याला सीबीआयने पुण्यातून शुक्रवारी अटक केली हाेती. कुलकर्णी हा रसायनशास्त्राचा अध्यापक असून, परीक्षा प्रक्रियेशी संबंधित होता. पुण्यातील बिबवेवाडी परिसरात ब्यूटी पार्लर चालविणारी मनीषा वाघमारे हिलादेखील यापूर्वी अटक केली होती. ‘सीबीआय’ने जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, अहिल्यानगर परिसरातून आतापर्यंत नऊ आरोपींना अटक केली आहे. त्यातील पाच आरोपींना सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.